रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर
Raigad Crime : रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून
रायगड धक्कादायक घटना, हत्येचं कारण समोर
म्हसळा, जि. रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेंदडीकोंड गावातील दोन सख्ख्या भावांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव कांबळे (वय 63, मजूर) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60, निवृत्त कर्मचारी) या दोघांना अवघ्या 12 तासांत अटक केली. मृतांची नावे महादेव कांबळे (वय 95) आणि विठाबाई कांबळे (वय 83) अशी असून, दोघांचे मृतदेह घरातच आढळले. मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (वय 40, रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेने म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक की आत्महत्येमुळे? याबद्दल संभ्रम होता. परंतु म्हसळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने तपास सुरू केल्यानंतर प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले. संशयाच्या आधारावर तपास पुढे नेल्यानंतर फक्त 24 तासांत पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.
हेही वाचा : 'मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल पण...', शिंदेंच्या मराठी आमदारने उडवली खळबळ
चौकशीत नरेश आणि चंद्रकांत कांबळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आई-वडील घरखर्चासाठी पैसे देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत, या कारणावरून दोन्ही मुलांना पालकांविषयी तीव्र नाराजी होती. या रागाच्या भरात त्यांनी आपलेच आई-वडील संपवण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून त्यांनी दोघांचा गळा घोटून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपी पळून गेले.










