Video: महाबळेश्वर, साताऱ्यात तुफान पाऊस, वेण्णा लेक ओव्हरफ्लो.. ही दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी!
Satara Rain Video: सातारा जिल्ह्यातील तुफान पाऊस आणि वेण्णा लेकचा ओव्हरफ्लो यामुळे एकीकडे निसर्गाचे सुंदर दृश्य अनुभवायला मिळत आहे. दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
ADVERTISEMENT

सातारा: महाराष्ट्रातील थंड हवेचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या तुफान पावसामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊ लागला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वेण्णा लेक ओव्हरफ्लो: पर्यटकांचा उत्साह, प्रशासनाची खबरदारी
महाबळेश्वरमधील वेण्णा लेक हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या तलावाची पाणी पातळी कमाल मर्यादेपर्यंत पोहोचली आहे. परिणामी, तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
हे ही वाचा>> Rain Update: जगबुडीचा कहर, रत्नागिरी गेलं पाण्याखाली.. पुराचं पाणी पाहून तुम्हालाही भरेल धडकी
वेण्णा लेक परिसरात पाण्याचा प्रवाह आणि धुक्याची चादर यामुळे निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. मात्र, या परिस्थितीमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने 19 ऑगस्ट 2025 पर्यंत महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, ठोसेघर धबधबा आणि अजिंक्यतारा यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

साताऱ्यात तुफान पाऊस
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषतः महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण आणि कराड या भागात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून, काही ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे.