महाराष्ट्र हादरला, लग्नाच्या वरातीत दोन खून, बाप-लेकाची निर्घृण हत्या; नेमकं कारण काय?
Wardha Crime News : वर्ध्याच्या बरबडी गावात सध्या स्मशानशांतता पसरली आहे. आनंदाचे वातावरण असलेल्या लग्नाच्या वरातीत रक्ताचे सडे पडले. 8 बाय 20 फुटांची एक छोटीशी जागा... किंमत कदाचित किरकोळ असेल, पण या जागेच्या हव्यासाने दोन जिवंत माणसं गिळली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, लग्नाच्या वरातीत दोन खून
बाप-लेकाची निर्घृण हत्या; नेमकं कारण काय?
Wardha Crime News : मानवी नात्यांना काळिमा फासणारी अतिशय भयानक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ज्या कुटुंबावर आणि रक्ताच्या नात्यावर आपण आयुष्यभर विश्वास ठेवतो, त्याच नात्याने क्रूरतेचा कळस गाठला असून अवघ्या 20 ते 30 हजार रुपयांच्या जमिनीच्या तुकड्यासाठी एका बापाचा आणि मुलाचा जीव घेण्यात आला आहे. वर्ध्याच्या बरबडी गावात ही धक्कादायक घटना घडली असून लग्नाच्या वरातीत शेकडो लोकांच्या देखत एका अल्पवयीन आरोपीने आपल्याच चुलत काका आणि भावाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आनंदाचे वातावरण असलेल्या लग्नाच्या घरात आता कायमची स्मशानशांतता पसरली आहे. 8 बाय 20 फुटांच्या एका छोट्याशा जागेच्या हव्यासापोटी दोघांना निर्घुणपणे संपवण्यात आलंय. या रक्तरंजित घटनेने माणुसकी पूर्णपणे संपल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
लग्नाच्या वरातीत रक्ताचे सडे आणि नियोजित हल्ला
बरबडी येथील बंडू वाळके यांच्या मुलाचे लग्न आटोपून वरात वाजत-गाजत निघाली असताना हा थरार घडला. महिलाश्रम जवळील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात पुढे सरकत असतानाच, दबा धरून बसलेल्या त्या अल्पवयीन आरोपीने काळजाचा थरकाप उडवणारे कृत्य केले. आरोपीला सज्ञान व्हायला अवघे 3 महिने शिल्लक असताना त्याने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या सख्ख्या चुलत भावावर आणि काकावर चाकूने सपासप वार केले. आजूबाजूला शेकडो लोक उपस्थित होते, ढोल-ताशांचा मोठा आवाज आणि आनंदाची गाणी सुरू होती, पण त्या गोंधळात एका नराधमाचा चाकू तळपत होता. त्याने पोटावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर इतके भीषण वार केले की पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी व्हावे. गंभीर जखमी झालेल्या बाप-लेकाला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
उद्ध्वस्त झालेले शेतकरी कुटुंब आणि पोलीस कारवाई
या भीषण हत्येमुळे एक हसते-खेळते शेतकरी कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घराचा मुख्य आधार असलेले वडील आणि तरुण मुलगा अशा दोघांचाही एकाच वेळी मृत्यू झाल्याने मागे आता फक्त एक एकाकी आई उरली आहे. ज्या किरकोळ जमिनीसाठी हा सर्व रक्तपात झाला, ती जमीन आता या माऊलीचे अश्रू पुसू शकेल का, असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला पडला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष टाले आणि त्यांच्या टीमने, तसेच पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत गर्दी पांगवून आरोपीला ताब्यात घेतले असून ज्या शस्त्राने हा थरार घडला, ते हत्यारही जप्त करण्यात आले आहे. आरोपीला पकडल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या गुन्ह्यातील सर्व तांत्रिक बाजू तपासून पाहिल्या जात आहेत.
समाजात फोफावणारी विकृती आणि तपासाचे आव्हान
या घटनेमुळे समाजात फोफावत चाललेल्या विकृतीबद्दल आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा अल्पवयीन मुलगा पुन्हा इतका मोठा गुन्हा करायला धजावतोच कसा, हा मोठा चिंतेचा विषय आहे. किरकोळ जागेच्या तुकड्यासाठी रक्ताची नाती इतकी स्वस्त झाली आहेत का, की वरातीत शेकडो लोकांच्या देखत असा निर्घृण खून करण्यापर्यंत आरोपीची मजल जाते? वर्ध्याच्या या घटनेने संपूर्ण राज्याला सुन्न केले असून जमिनीच्या एका छोट्या वादाने एका महिलेचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. रक्ताचं नातं विसरून जमिनीच्या तुकड्यासाठी केलेला हा नरसंहार मानवी सभ्यतेला काळिमा फासणारा ठरला आहे. पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या अल्पवयीन आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.









