Nanded: “त्या मस्तवाल खासदाराने…”, उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले. नांदेडमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून ठाकरेंनी गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on Nanded Hospital Deaths: “मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजले आहेत. ते बघून संताप येतोय”, अशा भावना उद्धव ठाकरेंनी राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंबद्दल व्यक्त केल्या.
शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “जेव्हा जगभरात करोनाचं संकट होतं. तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाराष्ट्रात तीच आरोग्य यंत्रणा आहे. ज्या आरोग्य यंत्रणेने ज्या साथीचा यशस्वी सामना केला. त्याच महाराष्ट्राची दुर्दशा सरकार बदलल्यानंतर चव्हाट्यावर आलीये. हेच डॉक्टर होते. नर्स तेच होते. त्यांनी जीवाची बाजू लावून रुग्णसेवा केली”, भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
एक फुल दोन हाफ… ठाकरे काय बोलले?
“माझ्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्र हे पहिलं असं राज्य होतं की, ड्रोनने औषधी पुरवली होती. नंदूरबारमधील टोकाच्या गावात लस पुरवल्या होत्या. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका योद्ध्यासारखे लढले, पण त्यांना आता बदनाम केलं जात आहे. कळवा, नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयाच्या बातम्या येताहेत. याला जबाबदार कोण? कुणीच जबाबदारी घेत नाहीये. एक फुल दोन हाफ कुठे आहेत?”, अशा शब्दात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
उद्धव ठाकरे म्हणाले की, “रुग्णालयात बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. मुख्यमंत्र्यांचं आणि दुसऱ्या हाफ उपमुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं की, कारण शोधायला पाहिजे होतं. नांदेडच्या डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाय. पण, फक्त एकाच डीनवर गुन्हा दाखल का झाला? कळवा, नागपूर, संभाजीनगरमध्येही बळी गेलेत.”