Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर
परळीत 20 जणांनी शिवराज दिवटे या तरूणाला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट, काचेची बाटली आणि लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केलं. "हा त्या भांडणात होता, याला मारुन टाका," असं म्हणत आरोपींनी तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख प्रकरणासारखी घटना

तरूणाला रिंगण करून टोळीनं मारलं

पोलिसांकडून 7 आरोपींना अटक
Shivaraj Divate Case Beed Crime : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये गुन्हेगारीची राज्यभर चर्चा झाली. सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निघृण हत्या केली, त्या घटनेनं राज्य हळहळलं होतं. मात्र, तरीही बीडमधील गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेईना. परळीत गेल्या दोन दिवसांपूर्वी तसंच रिंगण करुन एका तरूणाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आता सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची नावं समोर आली आहेत.
हे ही वाचा >> पवार, ठाकरे, राऊतांसमोर तुफान फटकेबाजी, 'नरकातला स्वर्ग' प्रकाशित करणारे शरद तांदळे कोण?
परळी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात 16 मे रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून, त्यांना बीड येथील बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. तर अन्य पाच आरोपींना परळी न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज नारायण दिवटे हा आपला मित्र जयदिप मुंडे याच्यासह मोटारसायकलवरुन लिंबोटी गावाकडे जात होता. त्यावेळी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तीन ते चार मोटारसायकलस्वारांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर आरोपींनी शिवराजला हाताने मारहाण करुन जबरदस्तीने रत्नेश्वर डोंगरातील झाडीमध्ये नेलं. तिथं सुमारे 20 जणांनी शिवराजला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट, काचेची बाटली आणि लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केलं. "हा त्या भांडणात होता, याला मारुन टाका," असं म्हणत आरोपींनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवराज यांनी जोरजोरात ओरडत मदतीसाठी याचना केल्या. तेव्हा काहीजण धावून आले. पण तोपर्यंत शिवराज बेशुद्ध झाला होता. या मारहाणीचा व्हिडीओ मारहाण करणाऱ्याच काहींनी मोबाईलवर रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला.
पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन विष्णु मुंडे (24, नंदागौळ), समाधान श्रीकृष्ण मुंडे (20, टोकवाडी), रोहन उमेश वाघुळकर (18 वर्ष 11 महिने, विद्यानगर), अदित्य बाबासाहेब गित्ते (18 वर्ष 10 महिने, नंदागौळ), तुकाराम ऊर्फ ऋषीकेश ज्ञानोबा गिरी (18 वर्ष 3 महिने, टोकवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राची महिना कमाई किती? तिच्या कृत्याने पोटावर येणार पाय?
जखमी शिवराज याच्यावर आधी परळीतील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर पुढच्या उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 17 मे रोजी शिवराज याच्या तक्रारीवरुन परळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 105/2025 अंतर्गत कलम 109, 126(2), 140(3), 118(1), 189(2),189(4), 190, 191(3) BNS अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.
दरम्यान, पोलिसांनी एकूण 20 आरोपींपैकी सात जणांना ताब्यात घेतलं असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारेही तपासाला गती देण्यात येत आहे.