19 वर्षीय मुलीने आंतरजातीय विवाह केला, आईने गोड बोलून घरी नेलं अन्...

मुंबई तक

19 वर्षीय मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या कुटुंबातील लोक नाराज होते. अखेर कुटुंबियांनी मिळून एक धक्कादायक निर्णय घेतला. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील ह्या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

19 वर्षीय मुलीला कुटुंबियांनीच संपवलं

point

तिचं फक्त 'इतकंच' चुकलं

Crime News : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाहाला विरोध करत मुलीच्या कुटुंबीयांनी तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर तिची ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर नेऊन जाळून टाकला. 19 वर्षीय सुजाता कुमारी असे मृत मुलीचे नाव आहे. सुजाताने याच वर्षी जानेवारी महिन्यात तिचा प्रियकर गौरीशंकरसोबत घरातून पळून जाऊन लग्न केले होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे मुलीच्या कुटुंबाचा या लग्नाला तीव्र विरोध होता. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील ही घटना आहे.

सहा वर्षांपासून प्रेमसंबंध

गौरीशंकर कुमार आणि सुजाता यांच्यात 2020 पासून प्रेमसंबंध होते. सुजाताचे आजोळ गौरीशंकरच्या गावातच होते आणि दोघे एकाच शाळेत शिकत होते. सहा वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर 18 जानेवारी 2026 रोजी दोघांनी घरातून पळ काढला आणि समस्तीपूर येथे लग्न केले. लग्नानंतर ते हरियाणाला गेले आणि तिथे पती-पत्नी म्हणून राहू लागले. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तिच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी हरियाणात छापा टाकून 11 फेब्रुवारी रोजी दोघांना ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात सादर केले असता सुजाताने आपण सज्ञान असून स्वतःच्या मर्जीने गौरीशंकरशी लग्न केल्याचे व त्याच्यासोबतच राहू इच्छित असल्याचे सांगितले. यानंतर गौरीशंकरची रवानगी तुरुंगात झाली, तर सुजाता तिच्या एका नातेवाईकाकडे राहू लागली. पुढे होळीच्या सणादरम्यान तिची आई तिला स्वतःच्या घरी घेऊन आली.

हे ही वाचा : मालक बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये, इकडे नोकराने मालकिणीसोबत...

व्हिडिओ करुन आत्महत्येची धमकी

गौरीशंकरच्या आरोपानुसार, 31 मार्च रोजी त्याचे सुजाताशी शेवटचे बोलणे झाले होते आणि त्यानंतर तिचा काहीच पत्ता लागला नाही. संशय आल्याने त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून पत्नीच्या हत्येची शंका व्यक्त केली आणि दोषींना अटक न झाल्यास आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲपद्वारे पोलिसांना अर्ज पाठवून पत्नीची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप केला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे एक तपास पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या सुजाताचा भावाला म्हणजेच अभिषेक कुमार याला अटक केली.

हे ही वाचा : बायकोनं सोडल्यावर संन्यास घेतला, आता आश्रमाच्या मागे सापडली बॉडी, साधूला कुणी संपवलं?

सहा जणांनी केली हत्या

पोलीस चौकशीत अभिषेकने आपला गुन्हा कबूल केला. सुजाताने आपल्या मर्जीने दुसऱ्या जातीच्या गौरीशंकरशी लग्न केले होते आणि ती पुन्हा तिच्या पतीकडे निघून जाईल अशी भीती कुटुंबाला होती. याच कारणास्तव 8 मे रोजी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह नदीच्या किनाऱ्यावर नेऊन जाळण्यात आला. आरोपीने दाखवलेल्या जागेवरून फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले आहेत. डीएसपी पूर्व अलय वत्स यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले होते आणि गौरीशंकरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमध्ये कुटुंबातील अन्य लोकांसह पाचहून अधिक जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलीस इतर आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी करत आहेत.
 

हे वाचलं का?