'10 कोटींची जमीन तुझी, फक्त आईला मारुन टाक' 24 वर्षीय आयुषीने कसा रचला कट?
सरकारी नोकरी मिळावी यासाठी एका 24 वर्षीय मुलीने आपल्या आईला संपवलं. यासाठी तिने तिच्या काकांची आणि चुलत भावाची मदत घेतली. तिने हा कट कसा रचला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'10 कोटींची जमीन तुझी, फक्त आईला मारुन टाक'
24 वर्षीय आयुषीने कसा रचला कट?
Crime News : एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 24 वर्षीय मुलीने केवळ संपत्ती आणि अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या हव्यासापोटी स्वतःच्याच आईची अत्यंत क्रूरपणे हत्या घडवून आणली. नीरज शर्मा असे मृत आईचे नाव आहे. यांचे पती विजय शर्मा (न्यायालयात एलडीसी) यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अनुकंपा नोकरी आईला मिळाल्याने आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या 16 वर्षांच्या भावाची जबाबदारी आईवर असल्याने मुलगी आयुषी शर्मा कमालीची चिडली होती. तिने आईचा काटा काढण्यासाठी थेट आपल्या चुलत भाऊ बलराम आणि चुलता मोहन शर्मा यांच्याशी हातमिळवणी केली. या बदल्यात तिने त्यांना आग्रा आणि भरतपूर येथील तब्बल 10 कोटींची जमीन देण्याचे आमिष दाखवले होते. राजस्थानमधील जयपूरमधील ही घटना आहे.
'असा' रचला कट
हा कट यशस्वी करण्यासाठी मोहन शर्माने भरतपूरच्या हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला, ज्याने हत्येचा प्लॅन आखण्यासाठी 7 लाख रुपयांची सुपारी मागितली. हेमंतने हरियाणा पासिंगची स्कोर्पिओ गाडी भाड्याने घेतली आणि नीरज यांना चिरडण्यासाठी आकाश आणि अरविंद नावाच्या तरुणांना नेमले. महिनाभरापूर्वीही त्यांनी नीरज यांना थार गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातून त्या वाचल्या. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नीरज यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले होते. मात्र, 4 जुलै रोजी जेव्हा त्या आपल्या दिव्यांग मुलाला घेऊन फिजिओथेरपिस्टकडे गेल्या होत्या, तेव्हा आयुषीने त्यांना तातडीच्या कामाचे कारण सांगून घरी बोलावले. त्या रस्त्यावरून चालत परतत असताना, पाळत ठेवणाऱ्या टोळीच्या इशाऱ्यावर आकाशने ताशी 100 किमीपेक्षा अधिक वेगाने स्कॉर्पिओ चालवून नीरजा यांना जोरात धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट कायमच, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही
मामाला आला संशय
अपघातानंतर आयुषीने अत्यंत चलाखीने मामाला फोन करून आईचा अपघात झाल्याचा कांगावा केला. मोहन शर्माने तातडीने मृतदेह गावी नेण्याची घाई केली, परंतु भाचीच्या बदललेल्या वागणुकीमुळे मामाला संशय आला आणि त्यांनी पोलिसांना अपघाताची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा 60 फुटी रुंद रस्ता पूर्णपणे मोकळा असतानाही स्कॉर्पिओने अगदी कडेने चालणाऱ्या नीरज यांना जाणीवपूर्वक उडवल्याचे दिसले. तसेच काही संशयित तरुण तिथे पाळत ठेवून असल्याचे आणि अपघातानंतर मृतदेह न पाहताच पळून गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अपघातग्रस्त स्कॉर्पिओ शोधून काढली आणि तिच्या मालकाद्वारे मुख्य सूत्रधार हेमंत शर्मापर्यंत पोहोचले. हेमंतने पोलिसांसमोर मोहन शर्मा आणि आयुषीच्या नावाचा खुलासा केला.
हे ही वाचा : रेल्वेचा डब्बा नव्हे हा तर हनिमून कोच.. Video समोर आला अन् टीसीचा बाजारच उठला!
पोलिसांवरच दबावाचा प्रयत्न
गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर पोलीस जेव्हा संशयित आरोपी आयुषीला ताब्यात घेण्यासाठी रुपावास गावात पोहोचले, तेव्हा कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या आयुषीने पोलिसांवरच दबाव आणण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर स्थानिक पोलिसांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि नंतर जयपूरला आणून इतर आरोपींसमोर चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. धक्कादायक बाब म्हणजे, पोटच्या आईचा जीव घेऊनही या निर्दयी मुलीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नाही. पोलीस कोठडीत ती पोलिसांना उलटसुलट उत्तरे देत असून, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरही या तरुणीने मौन बाळगले आहे. या प्रकरणात तिचा चुलत भाऊ बलराम सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.










