विरारच्या पुरातून वाचत ऑफिस कर्मचारी अंधेरीत आला अन् घात झाला!
tree fell in Andheri subway adesh gaikar injured : अंधेरी सबवेजवळ झाडाची फांदी डोक्यावर पडून विरारहून कामावर जाणारे आदेश गायकर गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जबाबदारीवरून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये प्रश्न उपस्थित झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विरारच्या पुरातून वाचत ऑफिस कर्मचारी अंधेरीत आला
अन् झाड पडल्याने घात झाला!
tree fell in Andheri subway adesh gaikar injured : वसई-विरार परिसरात गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई लोकल सेवा विरारपर्यंतच सुरू असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विरारचे आदेश गायकर हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अंधेरी येथील कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. अंधेरी सबवेजवळून ते पायी जात असताना अचानक एका झाडाची मोठी फांदी त्यांच्या डोक्यावर कोसळली. या धक्क्यात ते गंभीर जखमी झाले आणि जागीच बेशुद्ध पडले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदत करत त्यांना कुपर रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. संपूर्ण प्रकार मुंबई Takच्या प्रतिनिधी विद्या यांच्या समोर घडला असून त्यांनीही जखमीला मदत करण्यासाठी धाव घेतली.
झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने विरारचा कर्मचारी गंभीर जखमी
घटनेनंतर जखमीचे सहकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ते दररोज याच मार्गाने कार्यालयात जात असतात. मात्र, त्या दिवशी अचानक झाडाची फांदी तुटून थेट आदेश गायकर यांच्या डोक्यावर पडली. त्यांच्यासोबत आणखी सहकारी होते, मात्र फांदीचा सर्वाधिक फटका आदेश गायकर यांनाच बसला. त्या वेळी पाऊस सुरू होता आणि काही वेळापूर्वी जोरदार वारेही वाहत होते. फांदी पडताच ते बेशुद्ध झाले. पोलिसांनी तातडीने वाहनाची व्यवस्था करून त्यांना रुग्णालयात हलवले, तर त्यांचे सहकारीही उपचारासाठी त्यांच्यासोबत गेले.
"झाड खासगी मालमत्तेतील असल्याने जबाबदारी संबंधित सोसायटीची"
घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या ट्री ऑफिसर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. संबंधित झाड हे खासगी मालमत्तेतील असल्याने त्याची जबाबदारी संबंधित सोसायटीची असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सोसायटीला झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली होती आणि छाटणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे फांदी पडणे ही नैसर्गिक घटना असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. खासगी मालमत्तेतील झाड असल्यामुळे त्याची जबाबदारी महानगरपालिकेची नसून संबंधित सोसायटीची असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नगरसेवकांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सांगितले की, संबंधित कंपनीने झाडांच्या छाटणीसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली होती आणि छाटणीही केल्याचे सांगितले गेले. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता छाटणी योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीने झाल्याचे वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले. प्रथमदर्शनी संबंधित कंपनीकडून योग्य प्रकारे छाटणी न झाल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्ष काम योग्य प्रकारे झाले की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. घटनेनंतर झाड खासगी मालमत्तेतील असले तरी सार्वजनिक पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.










