महाआरतीला मला का बोलावलं नाही? मिसळ महोत्सव घे मी येतो..'राज'भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?

सकाळी 9 वाजून 1 मिनीटांनी राज ठाकरेंचा मेसेज आणि वसंत मोरे थेट निवासस्थानी दाखल
महाआरतीला मला का बोलावलं नाही? मिसळ महोत्सव घे मी येतो..'राज'भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे.

मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याच्या मुद्द्यावर नाराज झालेले पुण्याचे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी नुकतीच पुण्यात महाआरती घेतली. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी वसंत मोरेंची नाराजी दूर केली होती. यानंतर पुणे दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी वसंत मोरेंची भेट घेत, त्यांना महाआरतीला मला का बोलावलं नाहीस? अशी विचारणा केली आहे. खुद्द वसंत मोरे यांनी मुंबई तक शी बोलताना याबद्दल माहिती दिली.

"महाआरती आणि बाकीचे कार्यक्रम आटोपल्यानंतर मी आज उशीरापर्यंत झोपलो होतो. सकाळी 9 वाजून 1 मिनीटांनी साहेबांचा मेसेज आला की उठला आहेस का? फोन कर. रविवार असल्यामुळे मी निवांत होतो...तेवढ्यात साईनाथ बाबरचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की साहेबांनी भेटायला बोलावलं आहे. यानंतर लगेच आवरुन मी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या तिरुपती दौऱ्याबद्दल विचारपूस केली. बालाजीचं दर्शन कसं झालं हे देखील विचारलं."

यानंतर मी माझ्या महाआरतीच्या नियोजनाबद्दल त्यांना सांगितलं. कार्यक्रमाला चांगली गर्दी झाली, मीडियानेही त्याला प्रसिद्धी दिली, हे देखील सांगितलं. ज्यावर राज साहेबांनी मला महाआरतीबद्दल का सांगितलं नाहीस, मी पुण्यातच होतो असं म्हणत राज ठाकरेंना महाआरतीला यायची इच्छा होती असंही वसंत मोरे म्हणाले.

मुळात मला महाआरतीला परवानगी उशीरा मिळाली होती. त्यात साहेबांचा दौरा अचानक ठरल्यामुळे मला त्यांना ऐनवेळी सांगणं जमलं नाही म्हणून मी त्यांना एक मेसेज केला की मी संध्याकाळी महाआरती घेतो आहे असं स्पष्टीकरण वसंत मोरेंनी दिलं. यानंतर साहेबांच्या आणि माझ्या चांगल्या गप्पा झाल्या. त्यांनी मला विभागात कार्यक्रम घ्यायला सांगितला आहे. त्यामुळे साहेबांच्या सल्ल्यानुसार मी आता मिसळ महोत्सव आयोजित करणार आहे. साहेब सांगलीला जाणार आहेत त्यावेळी ते मिसळ महोत्सवाला हजेरी लावणार असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.

यावेळी पक्षांतर्गत नाराजीबद्दल बोलत असताना वसंत मोरेंनी पक्ष कार्यालयात आता माझं मन रमत नाही असं म्हणत अधिक बोलणं टाळलं. त्यामुळे आज दिवसभर राज ठाकरे आणि वसंत मोरे भेटीची चर्चा पुण्यात चांगलीच रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in