Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?
कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणाची सुरूवात झाली ती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीने! ही तक्रार समजून घेतली हे संपूर्ण प्रकरण लक्षात येतं.
ADVERTISEMENT

kirit somaiya covid centre scam : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केले. हे कोविड सेंटर वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना चालवण्याचे कंत्राट दिले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस! याच कंपनीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. याप्रकरणात मुंबईतील आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता ईडीनेही याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे प्रकरण समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. (What is Covid Centre scam case of BMC)
मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणाची सुरूवात झाली ती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीने! ही तक्रार समजून घेतली हे संपूर्ण प्रकरण लक्षात येतं. किरीट सोमय्या यांनी 24 ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते अडकत गेले.
लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेट सर्व्हिसेस विरुद्ध किरीट सोमय्या
किरीट सोमय्यांच्या आरोपानुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मच्या भागीदारांनी वैद्यकीय सेवा पुरवण्याचा कोणताही अनुभव नसताना बनावट कागदपत्रे मुंबई महापालिका आणि पीएमआरडीएला दिली आणि जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवले.
हेही वाचा >> Suraj Chavan : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या घरासह 16 ठिकाणी ED चे छापे
पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरला वैद्यकीय सेवा व स्टाफ पुरवण्याचे काम लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे होते. पण, तिथे मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. याच केंद्रात पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर पुणे महापालिका आणि सरकारने समिती नेमली. चौकशीत या कंपनीला वैद्यकीय सेवा पुरवण्याचा अनुभव नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीचे कंत्राट रद्द करतानाच समितीने या कंपनीला कंत्राट न देण्याचे बजावले होते. असं असतानाही मुंबई महापालिकेने जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला दिले.