शिवसेना : 'हेमंत गोडसे ते धैर्यशील माने यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच'

शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे : बंडखोरी केलेल्या खासदारांवर शिवसेनेनं सामनातून डागलं टीकास्त्र
shiv sena attacks 12 rebel mp who support eknath shinde
shiv sena attacks 12 rebel mp who support eknath shinde

राज्याच्या विधिमंडळापाठोपाठ संसदेतही शिवसेना खासदारांमध्ये फूट पडली. १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाला जाऊन मिळालेल्या १२ खासदारांसह शिवसेनेनं पुन्हा टीकास्त्र डागलंय.

शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे ?

शिवसेनेनं सामना अग्रलेखात म्हटलंय की, "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले," असं सेनेनं म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारांसोबत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसांनी वेढून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदारांना इतके भय कोणाचे वाटत आहे?"

"जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात फिरण्याची गरज नाही; पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार आहे. आपण शिवसेनेशी, जनतेशी व महाराष्ट्राशी प्रतारणा करत आहोत ही जळजळ त्यांना अस्वस्थ करीत आहे," अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण वेगळा गट स्थापन करीत आहोत या त्यांच्या बतावणीस अर्थ नाही. प्रत्येकाचे एक स्वतंत्र, व्यक्तिगत व केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाचे प्रकरण आहे. त्यातूनच हे पलायन घडले. हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, धैर्यशील माने असे खासदार ‘हिंदुत्व’ वगैरे मुद्द्यावर बोलतात ते आश्चर्यच आहे. त्यांचे मूळ व कूळ शिवसेनेचे किंवा हिंदुत्वाचे नव्हतेच. शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले. नाहीतर यांचे गोत्र काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच आहे हे काय कुणाला माहीत नाही, पण भाजपतही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाह्य जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे," अशी टीका शिवसेनेनं भाजपवरही केलीये.

"भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड हे अनेक पक्षांचा प्रवास करीत भाजपत पोहोचले. केंद्रीय मंत्रिमंडळातील निम्मे सदस्य हे मूळच्या हिंदुत्ववादी गोत्राचे नसून काँग्रेस किंवा अन्य जातकुळीतले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आज मूळ भाजपचे नाहीत, पण एखादे राज्य ताब्यात ठेवण्यासाठी, जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षातून आलेल्या लोकांनाही भाजपने मुख्यमंत्रीपद दिले. केंद्रात पदे दिली. महाराष्ट्रात तरी वेगळे काय घडले? शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडाच, पण उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी दिले नाही. पण शिवसेना फोडून बाहेर पडलेल्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पायघड्याच घातल्या आहेत."

"आता म्हणे खासदारांच्या ‘12’च्या गटासही मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाणार. आता ही बक्षिसी म्हणजे शिवसेनेच्या वाटय़ास नेहमीच आलेले अवजड उद्योग खाते असेल की आणखी कोणते असेल, ते कळेलच. आता या फुटीर गटाच्या मंत्रिमंडळ भरतीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या निष्ठावंतांचा बळी जातोय तेच पाहायचे. एकंदरीत देशात कायद्याचे व संविधानाचे राज्य राहिलेले नाही."

"उपमुख्यमंत्री फडणवीस हे पूरपरिस्थितीची पाहणी करताना दिसत आहेत, पण त्यांचेही चित्त दिल्लीलाच लागून राहिले आहे. महाराष्ट्राची सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच, पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी त्या संकटात ‘बये दार उघड’ अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो लवकरच पेटून उठेल," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in