उदय सामंत हल्ला : शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेंसह 5 जणांना अटक, रत्नागिरीत झळकले बॅनर
माजी मंत्री आणि बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद रत्नागिरीत उमटले असून, हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकले आहेत. माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला […]
ADVERTISEMENT

माजी मंत्री आणि बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद रत्नागिरीत उमटले असून, हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स ठिकठिकाणी झळकले आहेत.
माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न पुण्यात झाला. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली असून, सोमवारी ते कात्रजमध्ये होते. आदित्य ठाकरेंची सभा पार पडल्यानंतर शिवसैनिक माघारी जात होते. त्यावेळी उदय सामंतांची गाडी त्यांना दिसली.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काच देखील फोडली. या हल्ल्यामध्ये गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केलं होतं.
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाच्या बॅनर्सवर काय लिहिलंय?
आमदार उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच रत्नागिरीतही उमटले आहेत. या हल्ल्याच्या निषेधाचे बॅनर रत्नागिरीत लागले आहेत. विशेष म्हणजे साळवी स्टॉप येथील शिवसेनेच्या शाखेपासून काही अंतरावर हे निषेधाचे बॅनर लागले आहेत.