एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे रत्नागिरीतील शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा…
-राकेश गुडेकर, रत्नागिरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत नेमके किती आणि कोणकोणते आमदार आहेत याचीच चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही आमदार नाही हे स्पष्ट झालं होतं. असं असतानाच आता दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला पोहोचत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रत्नागिरीतही शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा गेल्याचं चित्र […]
ADVERTISEMENT

-राकेश गुडेकर, रत्नागिरी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत नेमके किती आणि कोणकोणते आमदार आहेत याचीच चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही आमदार नाही हे स्पष्ट झालं होतं. असं असतानाच आता दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला पोहोचत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रत्नागिरीतही शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा गेल्याचं चित्र आहे.
शिवसेनेत भूकंप करून एकनाथ शिंदे थेट सुरुतमध्ये पोहचले. सध्या त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील तब्बल 9 आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पालघरमधील एक, ठाण्यातील पाच, रायगडमधील तीन आमदारांचा यामध्ये समावेश आहे. मात्र यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकही सेना आमदार नाही असं कालपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, त्याला धक्का बसला असून दापोलीचे आमदार योगेश रामदास कदम हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला तरीही हे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया आता जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत.