‘आम्हाला चक्की पिसायला जायचं नाही म्हणून मोदी हवेत’, राऊतांनी सांगितला किस्सा
राऊत यांनी मोदींनाही टोले लगावले आहेत. विरोधकांमुळेच मोदींना एनडीएचा जीर्णोद्धार करावा लागला, असं राऊतांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics : विरोधी पक्षांची बैठक अलिकडेच बंगळुरूमध्ये पार पडली. या बैठकीत इंडिया असं नावही या आघाडीला देण्यात आलं. पण, या बैठकीला जाण्यापूर्वीचा एक किस्सा शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये सांगितला. याच लेखात राऊत यांनी मोदींनाही टोले लगावले आहेत. विरोधकांमुळेच मोदींना एनडीएचा जीर्णोद्धार करावा लागला, असं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी लेखात म्हटलं आहे की, “काँग्रेसची मजबूत सत्ता असलेल्या कर्नाटकची राजधानी बंगळुरात देशातील 26 प्रमुख पक्षांचे एक संमेलन पार पडले. देशात 2024 साली लोकशाहीवाल्यांचे राज्य व्हावे, धर्मांधता व हुकूमशाहीचे राज्य नष्ट व्हावे यासाठी हे सगळे एकत्र आले व त्यांचे एकत्र येणे यशस्वी झाले. कारण त्याच दिवशी आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विस्कटलेल्या ‘रालोआ’ म्हणजे ‘एनडीए’ची जमवाजमव करून दिल्लीत बैठक घ्यावी लागली. हे बंगळुरू बैठकीचे यश म्हणावे लागेल.”
संजय राऊत आणि राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या नेत्यांमध्ये काय झाला संवाद?
“बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हाटेलात राष्ट्रवादीतून भाजपात सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते ‘एनडीए’ बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. मी सांगितले, “आम्ही बंगळुरात निघालोय.” यावर त्यांचा प्रश्न, “तेथे जाऊन आता काय साध्य होणार?”
“काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात,” असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, “विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी?”