हाच का पुरोगामी महाराष्ट्र? तरूणाने देवळात नारळ फोडल्याने संपूर्ण गावाचा दलित समाजावर बहिष्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र अशात या पुरोगामी प्रतिमेला तडा देणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूरच्या एका मंदिरात दलित तरूणाने दर्शन घेतलं आणि नारळ फोडला म्हणून संपूर्ण समाजावर बहिष्कार घालण्यातची घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात लातूर पोलिसांशी मुंबई तकने संपर्क साधला. तेव्हा त्यांनीही ही घटना घडली असून आम्ही त्यामध्ये मध्यस्थी केली आणि बहिष्कार मागे घ्यायला लावला असल्याचं सांगितलं.

नेमकं काय प्रकरण आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी गाव हे तसं काही हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात हे गाव असून कर्नाटकच्या सीमेजवळ हे गाव आहे. हे गाव तसं शांत असतं. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका घटनेने गावात तणाव निर्माण झाला. गावातील रितभात एका दलित समाजाच्या मुलाने मोडली म्हणून गावात तणाव निर्माण झाला होता. तीन दिवसांपूर्वी हा तरूण मंदिरात गेला. देवाच्या पाया पडत असताना त्याने नारळ फोडला. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी गावातल्या दलित समाजावर बहिष्कार टाकला.

हे संपूर्ण प्रकरण जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा पोलीस या गावात गेले. त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली आणि बहिष्कार मागे घ्यायला लावला. तसंच या गावात आता पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

बहिष्कार टाकला गेला म्हणजे काय?

ADVERTISEMENT

दलित समाजातील लोकांनी मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यायचं ही गावाची रित आहे. त्यात दलित तरूण मंदिरात गेला आणि त्याने नारळ फोडला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी दलित समाजावर बहिष्कार घातला. त्यांना किराणा देणं बंद करण्यात आलं, दळण देणं बंद करण्यात आलं, शेतातील मजुरीसाठी बोलावणं बंद करण्यात आलं, जो बहिष्काराचा नियम मोडेल त्याच्याकडून दंड घेतला जाईल असंही सांगण्यात आलं. तीन दिवस हा बहिष्कार सुरू होता ही बाब पोलिसांपर्यंत पोहचली तेव्हा सगळ्यात आधी गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर सगळ्यांशी चर्चा करून सामोपचाराने हे प्रकरण मिटवण्यात आलं आणि बहिष्कार मागे घेण्यात आला.

महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर या थोर नेत्यांची परंपरा आहे. पुरोगामी असल्याचे दावे कायमच केले जातात. मात्र जातीपातीचं भयाण वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे. तसंच समाजात जातीपातीची मूळं किती खोलवर रूजली आहेत हे देखील अधोरेखित झालं आहे. हाच का पुरोगामी महाराष्ट्र? असं विचारण्याची वेळ या घटनेमुळे आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT