नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवारांचा वार, एकनाथ शिंदेंचा पलटवार; काय घडलं?
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णय घेतला. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तत्पूर्वी या विधेयकावरील चर्चेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. नगराध्यक्षाची निवड जनतेतून करण्याच्या निर्णयावरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेवर शाब्दिक वार केला. एकनाथ शिंदेंही पलटवार करत अजित पवारांना उत्तर दिलं. नगराध्यक्षाची जनतेतून निवड […]
ADVERTISEMENT

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णय घेतला. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तत्पूर्वी या विधेयकावरील चर्चेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. नगराध्यक्षाची निवड जनतेतून करण्याच्या निर्णयावरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेवर शाब्दिक वार केला. एकनाथ शिंदेंही पलटवार करत अजित पवारांना उत्तर दिलं.
नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवार काय म्हणाले?
“वेगवेगळ्या विचारांची सरकारं येतात. जातात. पण, आपण संविधानाने बांधले गेलोय. संविधानाचा आदर आपण केला पाहिजे. आम्हीही लोकांचं प्रतिनिधीत्व करतोय आणि आम्ही पाहतो, याचे काय परिणाम होतात. जनतेतून नगराध्यक्षाची निवड म्हटलं, तर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीही निवडून येण्याचा प्रयत्न करतील. हे लोकशाहीसाठी घातक आहे.”
“नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा म्हणता आहात, तर मग मुख्यमंत्रीही जनतेतून करा ना. मुख्यमंत्री जनतेतून केला असता, तर तेही चाललं असतं. तुम्ही तुमच्या हातात आहे, ते वेगळं करणार आणि इथं मुख्यमंत्रीपद घेत असताना… आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. तुमच्या मनात काय आलं माहिती नाही, तुम्ही २० लोकांना घेऊन गेलात. त्याच्यात पुन्हा २० लोक मिळाली. ४० लोक मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं बहुमत केलं. असं का करता आलं? कारण आमदारांमधून मुख्यमंत्री होत होता म्हणून.
“जर दुसरा कुणाला तरी एकनाथ शिंदे व्हायचं असेल, तर त्याला साध्य करता येणार नाही. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर असं करता येत नाही. गरीबांना तिथं प्रतिनिधीत्व मिळणार नाही. आपण कितीही आव आणला, तरी नगरपरिषदेच्या निवडणुका कशा प्रकारे होतात, हे सगळ्यांना माहितीये? शेवटचे दोन दिवस तर झोपत पण नाही”, असं अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना काय दिलं उत्तर?
“अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडा. आता असं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलीये. त्या घटनेच्या तरतुदीनुसार आपण मुख्यमंत्री निवडतो. नगराध्यक्ष निवडीसंदर्भातील अधिकार राज्यांना दिलेले आहेत. तुम्हाला असं सूचवायचं का की घटना बदला? असं आहे का? आव्हाड मी काय खोटं बोलतोय का? अजित पवार जे म्हणाले त्यावरच मी बोलतोय. ते म्हणालेत का बदला म्हणून, तर नाही. त्यांचा मुद्दा तसा नव्हता. बोलताना माणूस बोलतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.