Advertisement

नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवारांचा वार, एकनाथ शिंदेंचा पलटवार; काय घडलं?

नगराध्यक्षांची निवड जनतेतून करण्याचं दुरुस्ती विधेयकावरील चर्चेवेळी विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा
monsoon session of maharashtra assembly 2022 : CM Eknath Shinde and Ajit pawar
monsoon session of maharashtra assembly 2022 : CM Eknath Shinde and Ajit pawar

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णय घेतला. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तत्पूर्वी या विधेयकावरील चर्चेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. नगराध्यक्षाची निवड जनतेतून करण्याच्या निर्णयावरून अजित पवारांनी एकनाथ शिंदेवर शाब्दिक वार केला. एकनाथ शिंदेंही पलटवार करत अजित पवारांना उत्तर दिलं.

नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवार काय म्हणाले?

"वेगवेगळ्या विचारांची सरकारं येतात. जातात. पण, आपण संविधानाने बांधले गेलोय. संविधानाचा आदर आपण केला पाहिजे. आम्हीही लोकांचं प्रतिनिधीत्व करतोय आणि आम्ही पाहतो, याचे काय परिणाम होतात. जनतेतून नगराध्यक्षाची निवड म्हटलं, तर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीही निवडून येण्याचा प्रयत्न करतील. हे लोकशाहीसाठी घातक आहे."

"नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडायचा म्हणता आहात, तर मग मुख्यमंत्रीही जनतेतून करा ना. मुख्यमंत्री जनतेतून केला असता, तर तेही चाललं असतं. तुम्ही तुमच्या हातात आहे, ते वेगळं करणार आणि इथं मुख्यमंत्रीपद घेत असताना... आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. तुमच्या मनात काय आलं माहिती नाही, तुम्ही २० लोकांना घेऊन गेलात. त्याच्यात पुन्हा २० लोक मिळाली. ४० लोक मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं बहुमत केलं. असं का करता आलं? कारण आमदारांमधून मुख्यमंत्री होत होता म्हणून.

"जर दुसरा कुणाला तरी एकनाथ शिंदे व्हायचं असेल, तर त्याला साध्य करता येणार नाही. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून गेल्यानंतर असं करता येत नाही. गरीबांना तिथं प्रतिनिधीत्व मिळणार नाही. आपण कितीही आव आणला, तरी नगरपरिषदेच्या निवडणुका कशा प्रकारे होतात, हे सगळ्यांना माहितीये? शेवटचे दोन दिवस तर झोपत पण नाही", असं अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना काय दिलं उत्तर?

"अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडा. आता असं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलीये. त्या घटनेच्या तरतुदीनुसार आपण मुख्यमंत्री निवडतो. नगराध्यक्ष निवडीसंदर्भातील अधिकार राज्यांना दिलेले आहेत. तुम्हाला असं सूचवायचं का की घटना बदला? असं आहे का? आव्हाड मी काय खोटं बोलतोय का? अजित पवार जे म्हणाले त्यावरच मी बोलतोय. ते म्हणालेत का बदला म्हणून, तर नाही. त्यांचा मुद्दा तसा नव्हता. बोलताना माणूस बोलतो", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"आपण घटनेप्रमाणेच कामकाज करतोय. त्याच्या विपरित अजिबात करत नाहीये. असे अनेक उदाहरण आपण घेतली आहेत. अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. एकच माझं म्हणणं आहे की, अधिकार देण्याचा विषय आहे. तर तोही आफण देऊ शकतो. त्याच्याबद्दल विचार करता येईल. अनियमित कारभार केला. चुकीचा निर्णय घेतला तर शासन त्याच्यावर कडक कारवाई करेल. कुणीतरी कायदा आणि न्यायपालिकेचा उल्लेख केला. न्याय आणि विधी विभागाची मान्यता आपण घेतलीये", असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं.

सरपंचाची निवडही थेट जनतेतून होणार?; एकनाथ शिंदे काय म्हणाले?

"पूर्णपणे सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच या गोष्टी केल्या आहेत. बरेच जण बोललेत. कोण कुणाचं बंदूक ठेवून. कुणाच्या तरी आग्रहाखातर मी निर्णय घेतोय. असं काही नाहीये. भास्करराव इकडे नाहीयेत, त्यांनी पूर्ण नगरविकास वाचून दाखवला. नगरविकास विभागावर भाष्य केलं. त्यात ते ग्रामपंचायचीचे सरपंच थेट होतील असंही सांगितलं. सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी म्हणून ९ हजार ग्रामपंचायतींनी ठराव केला आहे. सरपंच परिषदेनं मागणी केलीये. आम्ही जनतेचं ऐकतो."

"भास्करराव म्हणाले एकनाथ शिंदे तुम्ही स्वतःच्या विचाराने निर्णय घेतले पाहिजेत. त्यांना मला सांगायचं की, मी सक्षम आहे. देवेंद्रजी भी है साथ साथ, मेरा नाम है एकनाथ. मी सक्षम नसतो, तर एव्हढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? जयंतरावही भेटले, तेव्हा म्हणाले, असं कसं झालं?", असा सवाल एकनाथ शिंदेंनी भास्कर जाधव यांना केला.

उद्धव ठाकरे, तुमचंच ऐकत होते, तोच प्रॉब्लेम होता -एकनाथ शिंदे

"अजित पवार आता बोलत नाहीत, ते खासगीत बोलत होते सगळं. एकदा बोलले मला सांगितलं असतं तर मी कानात सांगितलं असतं. पण, तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना! तोच तर प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम तिथेच झाला सगळा. सगळ्या गोष्टी घडल्या ते जाऊ द्या. जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेत. बहुमताच्या जोरावर कुठलंही काम करणार नाही", असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in