Chhagan Bhujbal : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा
मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केलीये. यावरूनच आता शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal News : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून येत आहे. यातून आता सत्तेतील तीन पक्षांमधील नेते आमने-सामने आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यालाच विरोध केला आहे. भुजबळ थेट शिंदे सरकारला धारेवर धरत आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या आमदारांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला मागास सिद्ध करून स्वतंत्र आरक्षण द्या असं भुजबळ म्हणत आहेत. तर मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केलीये. यावरूनच आता शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
‘मंत्रिमंडळात ठेवलं नाही पाहिजे’
अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर छगन भुजबळांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे शिंदेंचे आमदारांची नाराजी लपून राहिली नाही. शिवसेना (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे भुजबळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
हेही वाचा >> ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?
संजय गायकवाड काय म्हणाले तेही वाचा… ते म्हणतात, “एक मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ तिरस्काराची भूमिका घेत आहेत. हा तिरस्कार बरोबर नाहीये. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायलं नाही पाहिजे. त्याला बाहेर केलं पाहिजे. तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करेन म्हणतो आणि इथे एका समाजाचा तिरस्कार करतो.”










