जयंत पाटलांना भाजपकडून ऑफर? भाजप नेता संजय राऊतांवर संतापला
राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर जयंत पाटील यांना आहे, असा दावा सामना अग्रलेखातून करण्यात आला. त्यावरून केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT

Political News Of Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मागे सध्या ईडीचा ससेमिरा लागलेला दिसत आहे. ईडीने त्यांची 9 तास चौकशीही केली. या चौकशीबद्दल सामना अग्रलेखात भाष्य करताना एक दावा केला गेला की, जयंत पाटील यांच्यावर भाजपत येण्यासाठी दबाव आहे. याच विधानावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. केशव उपाध्ये यांनी भाकरी आणि चाकरीचा उल्लेख करत संजय राऊत यांना लक्ष्य केलं. (Bjp Leader Keshav Upadhye hits out at Sanjay Raut)
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना काय उत्तर दिलं, त्याआधी सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं, ते आधी बघूयात. “पाटला-पाटलांतला फरक”, या मथळ्याखाली सामना अग्रलेख लिहिण्यात आला. त्यातून ईडीच्या चौकशीबद्दल भाष्य करण्यात आलं.
भाजपकडून जयंत पाटलांना ऑफर? सामनात काय म्हटलेलं?
अग्रलेखात म्हटलेलं आहे की, “जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे.”
केशव उपाध्ये यांचं संजय राऊतांना उत्तर
अग्रलेखातूनच अशा प्रकारचं भाष्य करण्यात आल्यानं भाजपकडूनही याला उत्तर देण्यात आलं. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं की, “भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॅार्म्युला आहे. सामनाची अवस्था संजय राऊतांनी त्यांच्या वक्यव्यांसारखीच म्हणजेच फेक न्यूज फॅक्टरीसारखी करुन ठेवली आहे.”