‘नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद भवन…’, ‘ठाकरें’नी PM मोदींना डिवचलं
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून मोदी सरकार टीका होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान मोदी यांच्यावर राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून टीका केली आहे.
ADVERTISEMENT

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. विरोधी बाकावरील काही पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. “हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’ असे मोदींचे धोरण आहे”, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने हल्ला चढवला.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. “भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न”, अशा शब्दात ठाकरे गटाने खडेबोल सुनावले आहेत.
हेही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!
राष्ट्रपतींच्या हस्त उद्घाटन करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरून ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे. “उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.
संसद भवन नावावर करून घेतले का?
“नटवरलाल नावाच्या एका भामटय़ाने संसद भवन, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करून घेतले आहे काय? संसद भवन व त्यावरील सिंहाची तीन तोंडे म्हणजे भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे, पण या सिंहांनी गर्जना करू नये, रौद्ररूप धारण करू नये असे श्रीमान पंतप्रधानांना वाटत आहे”, असा टोला ठाकरे गटाने मोदींना लगावला आहे.