एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे रत्नागिरीतील शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा...

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता या बंडाची व्याप्ती अधिक वाढत आहे. त्यातच आता शिवसेनेच्या रत्नागिरीतील अभेद्य बुरुजाला देखील तडा गेला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे रत्नागिरीतील शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा...
ratnagiri dapoli shiv sena mla Yogesh kadam to guwahati(फाइल फोटो, सौजन्य: CMO)

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत नेमके किती आणि कोणकोणते आमदार आहेत याचीच चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही आमदार नाही हे स्पष्ट झालं होतं. असं असतानाच आता दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला पोहोचत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रत्नागिरीतही शिवसेनेच्या अभेद्य बुरुजाला तडा गेल्याचं चित्र आहे.

शिवसेनेत भूकंप करून एकनाथ शिंदे थेट सुरुतमध्ये पोहचले. सध्या त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील तब्बल 9 आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पालघरमधील एक, ठाण्यातील पाच, रायगडमधील तीन आमदारांचा यामध्ये समावेश आहे. मात्र यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकही सेना आमदार नाही असं कालपर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, त्याला धक्का बसला असून दापोलीचे आमदार योगेश रामदास कदम हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीकडे रवाना झाल्याचं वृत्त आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नसला तरीही हे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया आता जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचे जवळचे संबंध

शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. दरम्यान, गेले काही दिवस रामदास कदम शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे रामदास कदम यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जाहिरारित्या कदम पिता-पुत्रांना पाठिंबा देत, बळ दिलं होतं. त्यामुळे सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आ. योगेश कदम नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं होते. पण आज मात्र योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचल्याचं वृत्त आहे. त्यामुळे गेल्या महिन्यातील शिंदे–कदम भेटीचा उलगडा होऊ लागला आहे.

कोण आहेत शिवसेना आमदार योगेश कदम ?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव असलेले योगेश कदम यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम यांचा 13730 मतांनी पराभव केला होता आणि पहिल्यांदा ते आमदार झाले होते. योगेश कदम हे युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत.

दापोली विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांनी बाजी मारली होती. मात्र त्यानंतर योगेश कदम यांनी मतदारसंघ चांगला बांधला होता. अनेक विकासकामं केली. त्याचं फळ त्यांना 2019 च्या निवडणुकीत विजयाच्या रूपानं मिळालं.

योगेश कदम यांना 94529 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांना 80797 मतं मिळाली होती. मात्र असं असलं तरी योगेश कदम यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. कारण शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यांच्या बंडाचा सामना 2019 च्या निवडणुकीत योगेश कदम यांना करावा लागला होता.

दरम्यान, गेल्यावर्षी शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यातच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपही समोर आल्या होत्या. त्यातच यावर्षी झालेल्या दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली. शिवसेनेने या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर ही जबाबदारी दिली होती.

त्यातच विद्यमान आमदार योगेश कदम यांना डावलून एबी फॉर्म देण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले होते. नाराज शिवसैनिकांनी निवडणुकीत दोन्ही ठिकाणी अपक्ष फॉर्म भरले. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत दोन्ही तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती.

ratnagiri dapoli shiv sena mla Yogesh kadam to guwahati
आम्ही कुणाच्या पाठीत सुरा खुपसत नाही, शरणार्थी म्हणून नाही, स्वाभिमानाने जगू: शिवसेना खासदार

दरम्यान, दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाल्यानंतर खेड-दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं, राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती, आणि ती दुर्दैवाने दापोलीमध्ये यशस्वी झालीय असा थेट आरोप त्यांनी केला होता. त्यांचा रोख अर्थातच अनिल परब यांच्याकडे होता.

मार्चमध्ये दापोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी देखील आमदार योगेश कदम यांनी जोरदार भाषण केलं होतं. आमदार योगेश कदम यावेळी भाषण करताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं. 'मी एक स्वप्न पाहिलं होतं आज हे स्वप्न पूर्णत्वास जात आहे, त्याहीपेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्यांची प्रेरणा घेऊन मी या राजकारणात उतरलो, ते आमचे युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं याचा आनंद मोठा आहे.' हे सांगताना आमदार योगेश कदम भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in