‘नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?’, ठाकरेंच्या सेनेचा पलटवार, बावनपत्ती’ म्हणत…
चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमधील एक फोटो संजय राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असून, शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपला उत्तर दिले.
ADVERTISEMENT

Chandrashekhar Bawankule, Shiv Sena (UBT) : चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊ येथील एका हॉटेलमधील फोटो खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केला. याच फोटोवरून भाजप विरुद्ध संजय राऊत यांच्यात जुंपलीये. भाजपकडून ठाकरे गटावर टीकेचे बाण डागण्यात आले. त्याला आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेंना बावनपत्ती म्हणत ठाकरेंच्या सेनेनं पलवटवार केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ येथील कॅसिनोतील फोटोने राज्याच्या राजकारणात कलगीतुरा रंगला. बावनकुळेंनी त्यावर खुलासा केला. तर भाजप आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर हल्ला चढवला. भाजपकडून झालेल्या टीकेला आता सामना अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने उत्तर दिलं.
ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला काय दिलं उत्तर?
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे महाशय उद्धव ठाकरे, शरद पवारांपासून अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलतात व असे बोलणे ही एक विकृती आहे, असे राज्यातील देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना वाटत नाही. त्याच बावनकुळ्यांचा एक ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही.”
हेही वाचा >> भारतात येताच बावनकुळेंची कॅसिनोतील ‘त्या’ फोटोवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सामना संपादकीयात म्हटलंय की, “महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे हे अध्यक्ष सध्या चीनचा प्रदेश ‘मकाऊ’ येथे सहकुटुंब असल्याचे प्रदेश भाजपने जाहीर केले. ‘कुळे’ हे त्यांच्या कुटुंबासोबत कोठे असावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील ‘कॅसिनो’मध्ये मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे. कुळे यांच्या टेबलवर ‘पोकर्स’ नामक जुगारात खेळले जाणारे चलन विखुरले आहे व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती ‘आकडा’ लावला आहे तो त्यांच्या टेबलावरील स्क्रीनवर झळकला आहे.”