शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले, सगळेच चक्रावले
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सगळे कार्यकर्ते निर्णय मागे घेण्याची मागणी करत असताना अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंपच झाला. वाय.बी. चव्हाण सभागृहात कार्यकर्त्यांनी ठिय्याच दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनीही हा निर्णय मान्य नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यी भूमिका मांडली. अजित पवार कार्यक्रर्त्यांवरच भडकले. त्यांची भूमिका ऐकून कार्यकर्तेही चक्रावले.
अजित पवार म्हणाले, “आदरणीय साहेब… सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकलेल्या आहेत. पाहिलेल्या आहेत. आताही पाहताहेत. सगळ्या वडिलधाऱ्यांचं, जिवाभावाची साथ देणाऱ्या सगळ्यांचं ऐकलं आहे. तुम्ही एक गैरसमज करून घेताहेत की, पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षामध्ये नाही, अशातला भागच नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहेत खरगे, पण काँग्रेस चालली आहे सोनियाजींकडे बघून. त्यामुळे पवारसाहेबांच्या वयाचा विचार करता, साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतोय. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल.
“शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहे, हे येड्यागबाळ्याने पण सांगण्याचं कारण नाही. त्यामुळे आपण जे सारखं सारखं सांगताहेत… आता शरद पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. पवार साहेब लोकशाहीमध्ये जनतेचं ऐकतात हेही मी बघितेलेले आहे. त्यामुळे साहेबच आपले. त्यामुळे चव्हाण प्रतिष्ठानला यायचं, सिल्व्हर ओकला यायचं किंवा आणखी कुठे कार्यक्रम असतील तर साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे.”
नवा अध्यक्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल -अजित पवार
“उद्याच्याला पार्टीचा अध्यक्ष जो होईल, तो साहेबांच्या मार्गदर्शनालाखाली काम करेल. त्यापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही. अल्पसंख्याक समाजाचं जे सांगणं आहे की, तुम्ही असं का मनात आणता की, साहेब अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पाठिशी उभे राहतील. अध्यक्ष नसतील तर उभे राहणार नाही, हे साहेबांच्या रक्तात नाहीये. साहेब अध्यक्ष असो वा नसो सगळा आपला परिवार असाच पुढे चालत राहणार आहे.”










