भाजप महाराष्ट्रात नेतृत्व बदलणार?, विनोद तावडेंचं कोणाकडे बोट?
देशातील तीन राज्यात भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ नव्या नेत्यांच्या गळ्यात टाकून धक्कातंत्राचे राजकारण केले. तो फॉर्म्यूला आता राज्यात वापरणार की, आणखी काही वेगळा निर्णय भाजप घेऊ शकते त्याविषयी विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड अशी उत्तरं दिली आहेत.
ADVERTISEMENT

Vinod Tawade: नुकताच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाले. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदावर नव्या चेहऱ्यांना संधी देत धक्कातंत्राचाही वापर करण्यात आला. तीन राज्यातील भाजपच्या घवघवीत यशानंतर आता भाजपकडून महाराष्ट्रातही बदल करणार का या प्रश्नावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretary) विनोद तावडे यांनी थेट उत्तरच दिले आहे. नेतृत्व बदलाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपचा कोणताही उमेदवार सलग दोन-तीन वेळा निवडून आला म्हणून त्याला तिकीट मिळेल असं नाही. त्यासाठी भाजपची वेगळी रणनीति असून गेल्या पाच वर्षातील उमेदवारांची कामगिरी बघूनच विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने तीन राज्यात धक्कातंत्राचा वापर करून मुख्यमंत्री पदाची माळ नव्य नेत्यांच्या गळ्यात टाकली, त्यावरूनच त्यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं का असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर देत सांगितले की, तेही माझ्याच हातात आहे मात्र मी मुख्यमंत्री होईल का असा प्रश्न पत्रकारांना का पडत नाही असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना केला. त्यामुळे राज्यातील राजकारणात भाजपकडून धक्कातंत्र देत बदल होऊ शकतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
भाजप मुसंडी मारणारच
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाकडून 2014 नंतर देशातील राजकारणाच्या मुख्य प्रणालीमध्येच मोठे बदल घडवून आणले गेले. त्यामुळे देशातील आगामी निवडणुकीत भाजप जोरदार मुसंडी तर मारणारच आहे. मात्र त्याचबरोबर मागील निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला अधिक जागा मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
तसा निर्णय होणार नाही
भाजपकडून राजकारणाच्या मुख्य प्रणालीमध्ये बदल घडवून आणल्यामुळेच तीन राज्यात मुख्यमंत्री पदावर नवे चेहरे बसवण्यात आले. त्यावरही त्यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, एखादा खासदार किंवा आमदार सलग दोन-तीन वेळा निवडून आला आहे म्हणून त्याला तिकीट दिले जाईल असं नाही. कारण भाजप त्यासाठी तिकीट वाटप करण्याआधी मागील पाच वर्षातील उमेदवारांची कामगिरी विचारात घेऊनच उमेदवारीचा विचार करते असंही त्यांनी यावेळी सांगितले.