शरद पवारांना मोठी ऑफर? काँग्रेस, शिवसेना (UBT) टेन्शनमध्ये, काय शिजतंय?
अजित पवार-शरद पवार भेटीने पुन्हा एकदा शंका आणि राजकीय शक्यतांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar meet Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. या बैठकीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी भाजपने अजित पवार यांच्या माध्यमातून मोठी ऑफर दिल्याचे वृत्त माध्यमांत झकळले. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेना (युबीटी), काँग्रेस अस्वस्थ आहेत. तशा भूमिका दोन्ही पक्षाकडून मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत पडद्यामागे चाललंय काय? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
भाजपसोबत जाणाऱ्यांशी आपला संबंध नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीतही संभ्रम नाही, असेही पवार म्हणालेत. मात्र आघाडीचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने शरद पवारांना मोठी ऑफर दिल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
शरद पवारांना मिळालेल्या ऑफरमध्ये काय?
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने पृथ्वीराज चव्हाण यांचा हवाला देत आपल्या वृत्तात दावा केला आहे की, भाजपने शरद पवार यांना केंद्रात कृषीमंत्रीपद आणि नीति आयोगाचे अध्यक्षपद देऊ केले आहे. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांना मंत्री करण्याची ऑफरही देण्यात आली आहे.
वाचा >> नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत सरकार मोठा निर्णय घेणार,काय म्हणाले उदय सामंत?
कोणती कयास लावले जात आहेत?
खरे तर नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही गुप्त बैठक झाली. याचवर्षी जुलैमध्ये अजित यांनी शरद पवारांविरुद्ध बंड करून महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले. मात्र, या बंडखोरीनंतर अजित पवार यांनी दीड महिन्यात चार वेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे एक गोंधळ निर्माण झालेला आहे.