BMC Mayor: एकनाथ शिंदेंचा महापौर बसू शकतो, भाजपसोबत ‘प्रेशर टॅक्टीस’मागे ‘या’ आहेत 10 शक्यता
मुंबईत भाजप की शिवसेना यांचा महापौर होणार? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. त्यातच शिंदेंकडून जबरदस्त दबावतंत्राचा वापर केला जात आहे. अशावेळी नेमकं काय-काय घडू शकतं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, आणि सध्या एकनाथ शिंदे भाजपवर मात करण्यासाठी जे पत्ते टाकत आहेत, ते पाहता मुंबईतील महापालिकेचं राजकारण अजुन संपलेलं नाही असंच दिसतंय. शिंदेंनी शिवसेनेचे 29 नगरसेवक पंचतारांकीत हॉटेलमध्ये का ठेवले, त्यामागे काय कारणं असू शकतात, त्यात कुठल्या शक्यता दडलेल्या असू शकतात? खरा प्रश्न हा आहे. त्याच शक्यतांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 89 जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेनेनी 29 जागांवर विजय मिळवलाय. दोघांनी महायुतीत निवडणूक लढवली, त्यामुळे दोघांची मिळून मुंबईवर सत्ता आली आणि आकडेवारीप्रमाणे भाजपचा महापौर बसणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं. मात्र खरा खेळ त्यानंतर सुरू झाला.
शिवसेना ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले. मग अशावेळी प्रश्न निर्माण होतो तो, निकालाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे 29 नगरसेवक पंचतारांकीत हॉटेलमध्ये का ठेवले? असं काय घडलं किंवा असं काय घडू शकतं, ज्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
हे ही वाचा>> मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून
शिंदेंच्या पक्ष नेत्यांकडून अगदी तोकडं कारणं त्यासाठी पुढे केली जातायत, नगरसेवकांचं दोन दिवसीय शिबीर आहे, त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्यासाठी बोलावलंय वगैरे वगैरे. पण निकाल्याच्या दुसऱ्या दिवशी नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामाला हलवणं हे राजकारणाची थोडी जरी जाण असेल तर एक सामान्य व्यक्ती ही कारणं हास्यास्पद ठरवू शकतो. मग यामागच्या शक्यता काय असू शकतात? तेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.










