ईडीची थेट 661 कोटीच्या मालमत्तेवर टाच, काँग्रेसला दणका, नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
National Herald Case : नॅशनल हेराल्ड हे एक इंग्रजी वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राची स्थापना 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून केली होती. सध्या हे प्रकरण काय चर्चेत आलंय, समजून घेऊ....
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय?
सोनिया गांधी, राहुल गांधींसह कोण कोण आरोपी?
681 कोटी रुपयांची प्रॉपर्टी नेमकी कुणाची?
ED Notice in National Herald Case : काँग्रेस पक्षाला एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. ED ने नॅशनल हेराल्ड प्रकरणात 'यंग इंडियन' आणि AJL शी संबंधित 661 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी नोटीस बजावली. त्यामुळे पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड प्रकरण चर्चेत आलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर, विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आलेले आहेत. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी आणि त्याच्या संलग्न कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणाची सुरुवात 2012 मध्ये झाली, जेव्हा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध आर्थिक अनियमिततेची तक्रार दाखल केली.
नॅशनल हेराल्ड प्रकरण काय? थोडक्यात समजून घ्या...
नॅशनल हेराल्ड हे एक इंग्रजी वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राची स्थापना 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून केली होती. स्वातंत्र्यसैनिकांना मंच उपलब्ध करून देणं आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध आवाज उठवणं हा या वृत्तपत्राचा उद्देश होता. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) नावाच्या कंपनीद्वारे प्रकाशित केलं जात होतं. AJL ही कंपनी नॅशनल हेराल्डसह नवजीवन (हिंदी) आणि कौमी आवाज (उर्दू) ही वृत्तपत्रेही प्रकाशित करत होती.
स्वातंत्र्योत्तर काळात नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस पक्षाशी जवळून जोडलं गेलं. अनेकदा या वृत्तपत्राकडे काँग्रेसचं मुखपत्र म्हणून पाहिलं जाऊ लागलं. मात्र, आर्थिक अडचणींमुळे 2008 मध्ये या वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद झालं. 2016 मध्ये ते डिजिटल स्वरूपात पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला फारसं यश मिळालं नाही.
हे ही वाचा >> IPS अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल, नागपूरमधील डॉक्टर महिलेने काय आरोप केले?
नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा मुख्य मुद्दा हा AJL आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (YIL) या कंपनीशी संबंधित आहे. यंग इंडियन ही एक ना-नफा कंपनी आहे. कंपनीची स्थापना नोव्हेंबर 2010 मध्ये झाली. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38% हिस्सेदारी आहे. कंपनीत उर्वरित हिस्सा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता. या दोघांचंही निधन झालं आहे.










