शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'ती' मागणी अखेर मान्य
Election Commission freezes trumpet symbol : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी चिन्ह गोठवलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या “पिपाणी (ट्रम्पेट)” या चिन्हामुळे तोटा सहन करावा लागला होता. या चिन्हामुळे गोंधळ निर्माण होत असल्याने शरद पवार गटाने “पिपाणी” हे चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून “पिपाणी” हे चिन्ह वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
“पिपाणी” या चिन्हाला निवडणूक आयोगाच्या यादीत “तुतारी” असे नाव देण्यात आले होते. या नावाच्या साधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी काही मते अपक्ष उमेदवारांच्या खात्यात गेल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केला होता. त्यामुळे आयोगाकडे या चिन्हावर बंदी घालण्याची विनंती करण्यात आली होती. सुरुवातीला आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली असून 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून “पिपाणी (ट्रम्पेट)” हे चिन्ह वगळण्यात आले आहे.
अपक्षांकडून ‘पिपाणी’ चिन्हाला मागणी
लोकसभा निवडणुकीत “पिपाणी” या चिन्हाला मोठ्या प्रमाणावर मते मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनीही या चिन्हाची मागणी केली होती. विशेषतः शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड या मतदारसंघांमध्ये या चिन्हाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तसेच जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले, तर त्या ठिकाणी पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना अधिक मते मिळाली. त्यामुळे ही मते विभाजित झाली नसती, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे किमान 19 उमेदवार विजयी झाले असते, असा दावा करण्यात आला होता.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसलेला धक्का
रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड आणि सातारा या मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. साताऱ्यात संजय गाडे यांना तब्बल 37 हजार 62 मते मिळाली होती, तर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे 32 हजार मतांनी पराभूत झाले आणि भाजपचे उदयनराजे भोसले विजयी ठरले. याशिवाय विधानसभा निवडणुकीत सुमारे 10 मतदारसंघांत राष्ट्रवादीला या गोंधळाचा फटका बसल्याचे दिसून आले.










