खासदार धैर्यशील माने पोलिसांच्या ताब्यात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव, नेमकं काय घडलं?
Hatkanangale MP Dhairyashil Mane detained by police : हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने पोलिसांच्या ताब्यात, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात तणाव, नेमकं काय घडलं?
कोल्हापूर : केंद्र सरकारने 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना करताना मुंबई प्रांतातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मराठीबहुल गावे कर्नाटकात विलीन केली. या निर्णयाविरोधात सीमाभागातील मराठी जनता गेल्या 69 वर्षांपासून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून केंद्र सरकारचा निषेध करत आली आहे. महाराष्ट्रात सामील व्हावे, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने, मोर्चे आणि फेऱ्या घेण्यात आल्या. मात्र अद्याप मराठी लोकांना न्याय मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा मराठी भाषिकांनी आपला निर्धार व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्राशी जोडलेपण दाखवण्यासाठी बेळगावसह सीमाभागात काळा दिन साजरा केला. हजारो मराठी बांधवांनी निषेध फेरीत सहभागी होत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. मराठी लोकसंख्या अधिक असलेल्या या भागांना महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. दरम्यान, यावेळी खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
धैर्यशील माने पोलिसांच्या ताब्यात
या पार्श्वभूमीवर कर्नाटकात विजय दिन साजरा होत असताना मराठी समाजाने काळा दिन पाळण्याचा निर्णय घेतला होता. बेळगावमध्ये निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकात राहणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेतेही दरवर्षी या रॅलीत सहभागी होतात. यंदा देखील शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हे मराठी बांधवांना समर्थन देण्यासाठी बेळगावकडे रवाना झाले होते. तथापि, कर्नाटक सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासदार धैर्यशील माने, विजय देवणे आणि इतरांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीदेखील हे नेते आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी धैर्यशील माने यांना ताब्यात घेतले आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, पुणे–बंगळुरू महामार्गावर कागल परिसरात महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळीच शिवसेना कार्यकर्ते संजय पवार, विजय देवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतुकीवरही परिणाम होऊन महामार्गावर काही काळासाठी जाम झालाय. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी थेट रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. “आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, मराठी लोकांसाठी आम्ही इथे आलो आहोत,” असे सांगत त्यांनी घोषणाबाजी केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील वातावरण अधिक तापले आहे. बेळगाव परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून, काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला असून, “मराठी लोकांवर अन्याय सुरूच आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आम्हाला थांबवले जात आहे, पण मराठी अस्मितेचा लढा आम्ही सुरूच ठेवू,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सीमाभागातील मराठी जनतेने आज पुन्हा एकदा महाराष्ट्राशी एकरूप होण्याची इच्छा स्पष्टपणे मांडली आहे. कर्नाटक सरकारकडून केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मराठी संघटनांमध्ये रोष आहे. मराठी बांधवांच्या न्यायाच्या या दीर्घ संघर्षात आजचा दिवस पुन्हा एकदा ऐतिहासिक ठरला आहे.










