Lok Sabha Election : मोदी-शाहांचा आता यांच्यावर ‘डोळा’! काय आहे स्ट्रॅटजी?
भाजप-काँग्रेससह सर्वच पक्ष 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विरोधकांची मोट बांधण्यासाठी कसरत सुरू असताना भाजपनेही काही विरोधी मित्रपक्षांना एनडीएत सामील करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
ADVERTISEMENT

Politics in Marathi : राजकीय पक्षाच्या ध्यानी मनी फक्त एकच विचार सुरू आहे, तो म्हणजे 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त यश कसं मिळवता येईल? पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत देशभरात राजकारण तापले आहे. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. पाटण्यामध्ये 3 जूनला विरोधकांनी एकजूट असल्याचे दाखवले. दुसरीकडे भाजपनेही विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. इतर पक्षांना एकत्र आणण्याची कसरत भाजपने सुरू केली असून, यामध्ये त्या पक्षांचा समावेश आहे, जे विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षांसोबत आघाडीत आहेत आणि भूतकाळात भाजपसोबतही एनडीएमध्ये होते. जाणून घेऊया आता भाजप कोणत्या प्रादेशिक पक्षांवर लक्ष ठेवून आहे त्याबद्दल? लोकसभा निवडणुकीत भाजपला या पक्षांकडून काय मिळू शकते?
HAM: जीतन राम मांझी
बिहारमध्ये 23 जून रोजी विरोधी पक्षांची एक बैठक आहे, परंतु त्याआधी नितीश कुमार यांना त्यांचा मित्रपक्ष हिंदुस्थानी अवाम मोर्चा सेक्युलरने (एचएएम) धक्का दिला. या पक्षाचे संस्थापक बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि नितीश यांचे मित्र जीतन राम मांझी आहेत. मांझी यांचा मुलगा संतोष समून बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक कल्याण मंत्री होता, पण 13 जून रोजी त्यांनी नितीश मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नितीश यांनी मांझी यांना विरोधी पक्षांच्या बैठकीत येण्याचे निमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मांझी यांनी अमित शाहा यांची घेतली भेट
मांझी आता महाआघाडीबाहेर पर्याय शोधत आहेत. त्यामुळेच ते भाजपसोबत जाऊ शकतात या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. यापूर्वी 13 एप्रिल रोजी मांझी यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते 2024 पूर्वी एनडीएमध्ये परत येऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले होते. यानंतर त्यांनी नितीश कुमार यांची भेट घेऊन लोकसभेच्या 5 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यानंतर 13 जून रोजी त्यांच्या मुलाने नितीश मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. अशा स्थितीत महाआघाडीपासून फारकत घेतलेल्या मांझी यांचा एनडीएमध्ये समावेश करण्याची संधी भाजप सोडणार नाही, अशी शक्यता आहे.
दलित व्होट बँकेवर चांगली पकड
जीतनराम मांझी दलित समुदायात राजकारण करतात आणि बिहारमध्ये सुमारे 16 टक्के दलित मतदार आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या ३६ जागा दलित समाजासाठी राखीव आहेत. बिहारच्या दलित नेत्यांमध्ये जीतन राम मांझी हे एक प्रमुख नाव आहे.