5 लाखांहून अधिकचा खर्च येणाऱ्या 9 दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी निधी मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गरजू रुग्णांसाठी ₹5 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या 9 प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च राखीव निधीतून केला जाणार

अकोला महानगरपालिकेला वाणिज्य संकुल, शहर बसस्थानक आणि भाजी बाजार उभारण्यासाठी जमीन देण्यास मान्यता
Maharashtra Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल आणि गृहनिर्माण विभागासंदर्भात राज्य सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. 5 लाखांहून अधिकचा खर्च येणाऱ्या 9 दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आता राज्य सरकारकडून निधी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोण कोणते निर्णय घेतले आहेत? सविस्तर जाणून घेऊयात..
₹5 लाखांहून अधिक खर्चाच्या दुर्धर 9 आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार
विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रकमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी तसेच शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. गरजू रुग्णांसाठी ₹5 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या 9 प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च राखीव निधीतून केला जाणार आहे. आता आरोग्य हमी सोसायटीकडून मिळणाऱ्या निधीपैकी 20% रक्कम राखीव निधीसाठी जाणार आहे.
उर्वरित 80% रक्कम संबंधित रुग्णालयांना दिली जाणार असून या 80% निधीचा खालील प्रकारे वापर करता येणार आहे :
रुग्णालयांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 19%
रुग्णालयातील किरकोळ सामग्री व औषधांसाठी 40%
अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्यांसाठी 20%
कार्यक्रम सहाय्य माहिती व प्रचार प्रसिद्धीसाठी 1%
विस्तारीत योजनेमध्ये आरोग्य संरक्षणाची मर्यादा प्रति कुटुंब प्रति व्यक्ती ₹5 लाख इतकी आहे. मात्र या योजनेंतर्गत यकृत, अस्थिमज्जा, हृदय, फुफ्फुस इ. प्रत्यारोपणासारख्या ₹5 लाखांपेक्षा जास्त खर्च होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य संरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारांसाठी उपचार घेणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र अशा 9 आजारांसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे निर्माण होणाऱ्या राखीव निधीतून खर्च केला जाणार आहे.