बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा, शिंदेसेनेची इच्छा; नगरसेवकांचा हॉटेलात मुक्काम?
Mumbai Mahanagar Palika Mayor update : महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा फॉर्म्युला स्वीकारावा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर आणि उर्वरित अडीच वर्षे भाजपचा महापौर असावा, असा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा, शिंदेसेनेची इच्छा;
नगरसेवकांचा हॉटेलात मुक्काम? एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाचे आदेश
Mumbai Mahanagar Palika Mayor update : मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून महापौरपदावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा आणि दबावाचं राजकारण सुरू झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर बसावा, अशी ठाम इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक तसेच वरिष्ठ नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरत भाजपकडे स्पष्ट भूमिका मांडली आहे.
अडीच वर्ष महापौरपद मिळावं, शिंदेसेनेची मागणी
महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचा फॉर्म्युला स्वीकारावा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर आणि उर्वरित अडीच वर्षे भाजपचा महापौर असावा, असा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठका आणि अंतर्गत चर्चा सुरू आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेनेचा पाठिंबा अत्यावश्यक आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठ या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणार असून तो निर्णय येत्या काही तासांत किंवा दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंकडून हॉटेल पॉलिटिक्स
दरम्यान, महापौरपदाचा निर्णय होईपर्यंत शिवसेनेने ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना आज दुपारी तीन वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षांतर्गत एकजूट कायम राहावी आणि कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे सर्व नगरसेवक पुढील तीन दिवस वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. महापौरपदाचा निर्णय होईपर्यंत हे नगरसेवक एकाच ठिकाणी राहतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे. यामुळे सत्तास्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर शिवसेनेची ताकद अबाधित राहील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाला आहे.










