सर्वात मोठी बातमी: निवडणूक आयोग थोड्याच वेळात करणार मोठी घोषणा?
Maharashtra State election commission press conference : राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ही पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार?
Maharashtra State election commission press conference ,मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, आयोगाकडून आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ही पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर निर्णय होण्याच्या टप्प्यावर प्रक्रिया पोहोचली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता 14 डिसेंबर रोजी झाली. त्यानंतर महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेला गती मिळेल, असे संकेत दिले जात होते. अधिवेशन संपल्यानंतर 15 डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता येत्या 24 तासांतच निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याबाबत आयोगाकडून सकारात्मक विचार सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांमध्ये एकाच वेळी मतदान होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.










