केरळमध्ये डाव्यांना मोठा धक्का, तिरुवनंतपुरम महापालिकेत कमळ फुललं; 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
Thiruvananthapuram Corporation Election Result : डाव्या आघाडीला 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत यूडीएफला 19 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागा अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. बहुमतासाठी भाजपला आता केवळ एका जागेची गरज असून, सत्तास्थापनेचे गणित त्यांच्या बाजूने झुकलेले दिसते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केरळमध्ये 'लाल किल्ला' ढासळला
तिरुवनंतपुरममध्ये कमळ फुललं
डाव्यांच्या 45 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
तिरुवनंतपुरम : केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. अनेक वर्षांपासून डाव्या आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागांत काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) लक्षणीय यश मिळवत डाव्यांच्या वर्चस्वाला जबर धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, राजधानी तिरुवानंतपुरम महापालिकेत तब्बल 45 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) इतिहास रचला आहे.
राज्यातील बहुतांश स्थानिक संस्थांमध्ये यूडीएफने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांत मतदारांनी डाव्या आघाडीपासून दूर जात पर्याय शोधल्याचे चित्र दिसून आले. या निकालांनंतर काँग्रेस नेत्यांनी ‘केरळमधील लाल किल्ल्याला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डाव्यांच्या सातत्यपूर्ण सत्तेला मिळालेला हा धक्का आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं प्रमाण वाढलं; आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
या निवडणुकीचा सर्वाधिक गाजलेला निकाल तिरुवानंतपुरम महापालिकेचा ठरला आहे. 101 वार्डांच्या या महापालिकेत भाजपने 50 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक ताकदवान पक्ष म्हणून पुढे येण्याची कामगिरी केली आहे. डाव्या आघाडीला 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसप्रणीत यूडीएफला 19 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागा अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. बहुमतासाठी भाजपला आता केवळ एका जागेची गरज असून, सत्तास्थापनेचे गणित त्यांच्या बाजूने झुकलेले दिसते.










