NCP Crisis : शरद पवारांची स्ट्रॅटजी ठरली! अजित पवारांचा ‘डाव’ असा पाडणार हाणून
अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात केलेले दावे शरद पवार गटाने फेटाळून लावले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात शरद पवार गटाने वेगळी रणनीती आखली आहे.
ADVERTISEMENT

Ncp Crisis, Election Commission Hearing: खरी राष्ट्रवादी कुणाची? या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर पहिली सुनावणी शुक्रवारी (६ ऑक्टोबर) पार पडली. यावेळी अजित पवार गटाने युक्तिवाद केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शरद पवार गटाला युक्तिवादासाठी वेळ दिली जाणार आहे. पण, अजित पवार गटाकडून करण्यात येणार दावे हाणून पाडण्यासाठी शरद पवार गटाची स्ट्रॅटजी ठरली आहे. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याबद्दल सांगितलं.
निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काही बाबी मांडल्या. यात अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या काही दाव्यांबद्दल त्यांनी माहिती दिली.
शरद पवार गटाचे वकील काय बोलले?
सिंघवी म्हणाले, “दोन तास सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत दोन गोष्टी मांडण्यात आल्या. आम्ही आयोगाला सांगितलं की, तुम्ही आमची बाजू ऐकून न घेता… कुठला वाद आहे का? कुठली फूट आहे का? याबद्दल निर्णय घेऊन टाकला, तर ते चुकीचं असेल. आमची बाजू ऐकून घ्या. त्यानंतर निकाल द्यावा.”
“दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुनावणी दरम्यान नैसर्गिक न्यायाचा मुद्दाही उपस्थित केला. आम्ही उत्तरदायी आहोत, त्यामुळे आम्ही विरोध केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं की आमचा विरोध प्रथमदर्शनी मान्य केला जाणार नाही. पण, आयोगाने आम्हाला आश्वस्त केलं आहे की, दुसऱ्या गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सविस्तर ऐकून घेतलं जाईल”, असं सिंघवी यांनी सांगितलं.