राहुल गांधी अमेरिकेत गेले अन् महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून 'असं' काही बोलले की...
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन येथील एका विद्यापीठात भाषण करताना भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्याने आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
ADVERTISEMENT

बोस्टन (अमेरिका): लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेच्या बोस्टन शहरात भारतीय समुदायाला संबोधित करताना भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा दावा केला असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharahstra Vidhansabha Election) अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. या विधानामुळे भारतात राजकीय वादाला तोंड फुटले असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींचे आरोप
राहुल गांधी यांनी बोस्टन येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "निवडणूक आयोग पूर्णपणे मॅनेज झाला आहे आणि व्यवस्थेत काहीतरी खूपच गडबड आहे. मी यापूर्वीही अनेकदा हे सांगितले आहे... महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले आहे, हे स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने संध्याकाळी 5.30 वाजता मतदानाची आकडेवारी जाहीर केली आणि त्यानंतर 5.30 ते 7.30 या दोन तासांत 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचे सांगितले. हे भौतिकदृष्ट्या अशक्य आहे. एका मतदाराला मतदानासाठी साधारण तीन मिनिटे लागतात. जर तुम्ही हिशेब केला, तर याचा अर्थ रात्री २ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या असत्या, पण असे झाले नाही."
हे ही वाचा>> DCM Shinde VIDEO: 'राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार..' एकनाथ शिंदेंनी माइकच झिडकारला, शिंदेंना एवढा राग का आला?
राहुल गांधींनी पुढे असा दावा केला की, जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदान प्रक्रियेच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली, तेव्हा आयोगाने ती देण्यास नकार दिला. इतकेच नाही, तर आता अशा मागण्या करण्यावर बंदी घालण्यासाठी कायदा बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. "जेव्हा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला आणि त्यांनी कायदा बदलला, ज्यामुळे आता आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग मागण्याची परवानगी नाही," असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपचा पलटवार
राहुल गांधींच्या या विधानावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते प्रदीप भांडारी यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना "लोकशाहीविरोधी" आणि "भारतविरोधी" संबोधले. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले, "लोकशाहीविरोधी, भारतविरोधी राहुल गांधी, ज्यांना भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करता आला नाही, ते परदेशात जाऊन भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत." भाजप नेते शहजाद पुनावाला यांनीही राहुल गांधींवर हल्लाबोल केला.










