Rahul Kanal News : आदित्य ठाकरेंचा ‘खास माणूस’ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर
युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय राहुल कनाल हे युवा सेनेला राम राम करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आलीये.
ADVERTISEMENT

Rahul Kanal Latest News : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याच्या तयारीत गुंतलेले असतानाच, त्याच दिवशी त्यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. ठाकरेंच्या गटातील एक एक नेता मातोश्रीवरील नेतृत्वाला जय महाराष्ट्र करताना दिसले. आता आदित्य ठाकरेंच्या खास माणूस म्हणून ओळखला जाणारा युवासेनेचा नेत्याने ठाकरेंची साथ सोडली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. (close aide of Aditya Thackeray Rahul Kanal, executive member of Yuva Sena is likely to join CM Eknath Shinde camp)
युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय राहुल कनाल हे युवा सेनेला राम राम करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आलीये. कनाल यांच्या पक्षांतराबद्दलच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेवर ज्या दिवशी मोर्चा काढणार आहेत, त्याच दिवशी कनाल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे कळतेय.
लवकरच निर्णय जाहीर करणार -राहुल कनाल
या सगळ्याबाबत जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार आहेत”, असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर म्हणाले आहेत. त्यामुळे मातोश्री आणि आदित्य ठाकरेंच्या वर्तुळातील राहुल कनाल यांनी युवा सेना सोडल्यास तो आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का असेल, असं सांगितलं जातं आहे.
हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर युवा सेनेतही याचे पडसाद उमटले होते. गेल्या वर्षभरापासून युवा सेनेतील अनेक पदाधिकारी शिंदेंच्या युवा सेनेत दाखल झाले आहेत. त्यातच काही दिवसांपासून अंतर्गत कुरघोडीवरुन राहुल कनाल यांनी युवा सेना कोअर कमिटीचा ग्रुप देखील सोडला होता.










