सांगली: बँकेच्या भरती प्रक्रियेला स्थगिती; सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांनी नेमकं केलं तरी काय?
जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून आता 559 जागांसाठी आयबीपीएस, टीसीएसकडून होणार भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
ADVERTISEMENT

सांगली: सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व सहकारी बँकेतील भरतीसाठी आयबीपीएस (IBPS) व टीसीएस (TCS) या संस्थाद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी सहकार आयुक्त पुणे यांना आदेश काढले असल्याची माहिती माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि moपार पडावी, यासाठी आयबीपीएस व टीसीएस या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमार्फत भरती परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
यापूर्वी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जी अमरावतीची एक संस्था जिल्हा बँकेने नियुक्त केली होती. ती सध्या काळ्या यादीत गेलेली आहे. तसेच तिचे सर्व संचालक तुरुंगात आहेत. अशा संस्थेला ही जबाबदारी देणे चुकीचेच होते. त्यावेळी त्यांनी "एकेका लिपीक उमेदवारासाठी 20 ते 25 लाख व शिपाई उमेदवारासाठी 12 ते 15 लाख रुपये असा दर लावल्याची चर्चा सुरु होती. यापूर्वी सन 2011 मध्ये केलेल्या नोकर भरतीत प्रचंड गैरव्यवहार झाला असून, त्याची आता चौकशी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत नोकर भरतीत पात्र व योग्य उमेदवार येणे आवश्यक आहे. ही भरती बँकेच्या संचालकांच्या शिफारशीनुसार होऊ नये'', अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.
हे ही वाचा>> मुली नाचवून पैसे कमावतात, गुंड पोसतात, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अनिल परब इरेला पेटले
आ.खोत पुढे म्हणाले, " या बँकेची यापूर्वी भरती प्रक्रियेची चौकशी सुरू असताना नव्या भरतीला प्रक्रिया सहकार मंत्री यांनी परवानगी देऊन ते बेजबाबदार वागले आहेत. या बँकेत नात्यागोत्यातील सगळे असल्याने यांनी वाटप करून संगनमत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. बॅंकेच्या एका संचालकाने ७ कोटी कर्ज काढलं, ते थकीत गेलं, सेटलमेंट केली, दुसरी कंपनी काढली त्यावर कर्ज काढलं, आणि आधीची कंपनीचे कर्ज भरले आहे, अशा सर्व बोगस संस्थांची कागदपत्रे आम्ही गोळा केली आहेत, काही संस्था कागदावरच अस्तित्वात आहेत. याबाबत देखील लवकरच चौकशा लावून कारवाई करणार आहे.'' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.