भक्तांचे ‘प्रतिपोलादी पुरुष’ म्हणत अमित शाहांवर शिवसेना (UBT) ची बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena ubt criticizes amit shah in saamana editorial on jammu kashmir terrorist attack
shiv sena ubt criticizes amit shah in saamana editorial on jammu kashmir terrorist attack
social share
google news

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पूँछमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. ज्यानंतर शिवसेना (UBT) पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर यावेळी देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. ‘देशाचे गृहमंत्री व भक्तांचे ‘प्रतिपोलादी पुरुष’ अमित शहा हे कामाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत.’ अशा शेलक्या शब्दात अमित शाह यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. (shiv sena ubt criticizes amit shah in saamana editorial on jammu kashmir terrorist attack)

‘2016 मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळय़ा पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र कश्मीरमधील दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री व पंतप्रधान राजकीय कामात व्यस्त आहेत त्याचाच फायदा घेऊन पाकड्या अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनांवर बॉम्ब फेकले. ज्यात जवान शहीद झाले.’ असं म्हणत शिवसेनेने मोदी-शाहांवर टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • देशाचे गृहमंत्री व भक्तांचे ‘प्रतिपोलादी पुरुष’ अमित शहा हे कामाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भार त्यांच्यावर आहे. पुन्हा 2024 आधी देशातील सर्व विरोधी पक्ष मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला पुन्हा विजयी करायचे या कामातही ते व्यस्त आहेत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री व पंतप्रधान राजकीय कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरात लष्कराच्या वाहनांवर बॉम्ब फेकले. त्यात आपल्या पाच जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं.
  • कश्मीर खोरे शांत नाही व दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत हे पुन्हा उघड झाले. पूंछ-जम्मू मार्गावर दहशतवादी आपल्या जवानांवर बॉम्बहल्ले करीत असताना आपले पंतप्रधान दिल्लीत जागतिक बौद्ध शिखर परिषदेत भाषण देत होते. यावेळी पंतप्रधानांनी जगाला सांगितले, ‘‘भारत युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या मार्गावरूनच वाटचाल करतोय.’’ बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे. त्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादी जो हिंसाचार रोज घडवीत आहेत, तो शांततेच्या मार्गाने खरंच संपवता येईल काय?
  • चीन हा बुद्ध विचारांचा देश आहे. हिंदुस्थानच्या सीमा सगळय़ात जास्त कोण कुरतडत असेल तर तो चीन आहे. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे, चीन अरुणाचल प्रदेशचा लचका तोडू पाहत आहे. चीन हिंदुस्थानच्या विरोधात पाकिस्तान, नेपाळला मदत करीत आहे. चीन हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला तडे देत आहे. हे करताना चीन असे कधीच म्हणत नाही की, भगवान बुद्धाच्या भविष्य आणि शाश्वततेच्या मार्गावर त्याची वाटचाल सुरू आहे. चीन साम्राज्यवादी आहे आणि इतर देशांवर आर्थिक व इतर आक्रमणे करून त्याने त्याचे साम्राज्य वाढवले आहे. चीनमध्ये हुकूमशाही आहे व आवाज उठवणाऱ्यांना संपवले जाते. तेथे बुद्धाचा मार्ग कोठे दिसतोय का? इकडे कश्मीरात 370 कलम हटवूनही हिंसाचार थांबलेला नाही व शांतता नांदताना दिसत नाही. कश्मिरी पंडितांच्या ‘घर वापसी’चे वचनही हवेत विरले. उलट सरकारी कर्मचारी असलेल्या पंडितांना कार्यालयात घुसून अतिरेकी ठार करीत आहेत.
  • केंद्र सरकारच्या विरोधात पंडितांनी जम्मू आणि श्रीनगरात आंदोलन केले, पण सरकारतर्फे कोणीही पंडितांचे साधे निवेदन स्वीकारायला गेले नाही. हे हिंदू पंडितांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. भारताच्या दुष्मनांना धडा शिकवू, गोळीला गोळीने उत्तर देऊ, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवू, पाकने गिळलेला कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू व ते करण्याइतकी 56 इंचाची आपली छाती असल्याचे पंतप्रधानांकडून छातीठोकपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कश्मीरच्या भूमीवर आणि लडाख, अरुणाचलच्या भूमीवर उलटेच घडताना दिसत आहे. मोदी हे कालपर्यंत युद्धाची भाषा करीत होते, ते आता बुद्धाची भाषा बोलू लागले.

    हे ही वाचा>> ‘राष्ट्रवादीने सेक्युलरिझमला फाटा दिला’, अजित पवारांचं मोठं विधान… मनात नेमकं काय?

  • सत्य सांगायचे तर पाकड्यांसमोर ते युद्धाची भाषा करतात, पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो. भारताची ‘अतिथी देवो भव’ अशी संस्कृती असल्याचे पंतप्रधान म्हणतात. पण लडाख, अरुणाचलमध्ये घुसलेले व कश्मीरात घुसून आपल्या जवानांवर हल्ले करणारे ‘अतिथी’च आहेत असे मानावे काय? मजबूत पंतप्रधान व कणखर गृहमंत्री देशाला लाभला असताना लष्कराच्या छावण्यांवर, लष्कराच्या वाहनांवर अतिरेकी नामक ‘अतिथी’हल्ले करण्यास धजावतात. म्हणजे काहीतरी घोटाळा नक्की आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही सध्या मोदी-शहांची शस्त्र आहेत, पण त्या शस्त्रांना चिनी आणि पाकिस्तानी ‘अतिथी’ घाबरतात असे दिसत नाही.
  • जम्मू-कश्मीरचे विभाजन केले, पूर्ण राज्याचा दर्जा काढला, पण गेल्या चारेक वर्षांपासून तेथे निवडणुका घ्यायला दिल्लीचे सरकार घाबरत आहे. निवडणुकांशिवाय राज्य करायचं – मग त्या मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिका असोत नाहीतर जम्मू-कश्मीरसारखे संवेदनशील राज्य, लोकभावनेस चिरडून सत्ता गाजवायची हे विद्यमान राज्यकर्त्यांचे धोरण आहे. केंद्रातले सरकार 365 दिवस निवडणुकांच्या राजकारणात, गौतम अदानींचा बचाव करण्यात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याच्या कारस्थानात अडकून पडले आहे. त्यामुळे पुलवामा, उरी, पठाणकोटपासून कालच्या पूंछ-जम्मू मार्गापर्यंत आमच्या जवानांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत.

    हे ही वाचा>> Satya Pal Malik: पुलवामा हल्ल्यावरून PM मोदींना खिंडीत गाठणाऱ्या माजी राज्यपालांना CBI चं समन्स

  • कश्मिरी पंडितदेखील असुरक्षित आहेत. 2016 मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळय़ा पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र कश्मीरमधील दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र ना त्यावर पंतप्रधान बोलले ना आता जम्मू-पूंछ मार्गावरील हल्ल्याबाबत. कश्मीरातील हल्ल्यांवर तरी पंतप्रधान मोदी काही बोलतील काय? युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. नाहीतर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा. काय सांगावे, दुश्मन भाजपमध्ये प्रवेश करून शरणागतीच पत्करतील!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT