कल्याण-डोंबिवलीची कहाणी: शिंदे-चव्हाण पुढारी असलेल्या KDMC ची एवढी दैना झाली तरी कशी?
कल्याण-डोंबिवली हे शहर झपाट्याने उदयास येत आहे. मात्र, असलं तरी पायाभूत सुविधांच्या बाबतीत या शहराचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. दोन दिवसाच्या पावसातच या शहरातील बराचसा भाग हा पाण्याखाली गेला होता.

कल्याण-डोंबिवली: दोन दिवसाच्या सलगच्या पावसाने स्मार्ट सिटी बनविण्याची तयारी सुरू असलेल्या कल्याण-डोंबिवली शहराची अक्षरश: दैना उडाली आहे. सार्वजनिक वाहतुकीने आधीच त्रस्त असलेल्या या शहराची पहिल्याच पावसात धुळधाण उडाली. तुंबलेले रस्ते, बुडत चाललेली वाहनं, पाण्याखाली गेलेले ट्रॅक, बंद पडलेल्या रेल्वे, खंडीत झालेला वीजपुरवठा, या सगळ्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांचे पावसामुळे प्रचंड हाल झाले, संध्याकाळी ट्रेन किंवा बस नसल्याने अनेकांना चार ते पाच हजार रुपये मोजून टॅक्सीने घर गाठावं लागलं.
श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवलीतील बंगल्यातच शिरलं पाणी
कल्याण-डोंबिवली तेच शहर आहेत, जिथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील त्यांचं स्वत:चं घर हे पाण्याखाली गेलं होतं. ही गोष्ट तरी त्यांना माहिती नाही का? असा सवाल आता अनेक जण विचारत आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: मॉल म्हणावं की स्विमिंग पूल? नागरिकांनी रस्त्यावरच मारल्या बेडूक उड्या..ओबेरॉय मॉलची 'अशी' अवस्था कधी पाहिली नसेल
रवींद्र चव्हाणही डोंबिवलीचे पॉवरफुल नेते, तरीही..
तर दुसरीकडे नव्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेले रवींद्र चव्हाण हे देखील डोंबिवलीचे आमदार आहेत. शिंदे सरकारच्या काळात ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते. श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासारखी सत्तेतली दोन राजकीय मंडळी या शहरातून येत असतील आणि त्याच कल्याण-डोंबिवलीची पावसामुळे दाणादाण उडत असेल तर यापुढे मोठं दुर्दैवं काय म्हणावं?
कारण पावसामुळे अडचण केवळ सामान्य माणसांचीच झालेली नव्हती. श्रीकांत शिंदेंच्या घरातही पाणी घुसलं होतं. त्याचे व्हिडिओही समोर आले. कल्याणच्या पोलीस ठाण्यात तुंबलेल्या पाण्यात कारभार सुरू होता. अनेक ठिकाणी लोकांना हातातलं काम सोडून घरात शिरलेलं पाणी बाहेर काढावं लागत होतं. ऐरवी छत्र्या वाटल्या म्हणून क्रेडिट घ्यायला येणारे अनेक नेते लोकांचे साचलेल्या पाण्यामुळे हाल झाले तेव्हा गायब होते.
हे ही वाचा>> आली लहर केला कहर... भर पुराच्या पाण्यात टेबल टाकून मद्यपान करणाऱ्या काकांची जोडी! Video प्रचंड व्हायरल
कल्याण-डोंबिवली शहरात सार्वजनिक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीसुद्धा काही तासांच्या पावसात शहरात पूरस्थिती निर्माण होत असेल तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला गेला पाहिजे. ज्या कल्याण-डोंबिवलीकरांना यातना भोगाव्या लागल्या, याची नैतिक जबाबदारी महानगरपालिका, MMRDA किंवा राज्य सरकार घेणार आहेत का? सामान्य माणसांच्या खिशातून कररुपी जमा झालेल्या हजारो कोटींचा चुराडा करून सगळेच कसे नामानिराळे कसे काय होवू शकतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाही.