Maratha Reservation : “मोदींच्या खिशात आरक्षणाची चावी, जरांगेंनी…”, ठाकरेंचे दहा सवाल
Manoj Jarange Hunger strike end : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मराठा आरक्षणावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून दहा सवाल केले आहेत.
ADVERTISEMENT

Manoj Jarange Hunger Strike, Maratha Reservation, Saamana Editorial : ’31 डिसेंबरपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय लागेल. म्हणजे सरकार जाणार हे नक्की. मग शिवछत्रपतींची शपथ घेऊन मराठय़ांना आरक्षण देण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचललाय तो कशाच्या भरवशावर? शिवछत्रपतींची शपथ खोटी ठरवू नये हेच आमचे म्हणणे आहे’, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. (Shiv sena UBT Raised ten questions about maratha reservation)
मराठा आरक्षण मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे की, “सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत देऊन मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. जरांगे यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांनी पाणीही सोडले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी सगळय़ांनाच घोर लागून राहिला होता, पण जरांगे यांनी हट्टाने उपोषण सुरू ठेवले. ते सर्वपक्षीय नेत्यांच्या विनवणीनंतर मागे घेतले. उपोषण मागे घेतले हे खरे, पण आरक्षणाचा ‘पेच’ कायम आहे”, असं भाष्य सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
“मराठा आंदोलनामुळे राज्य जवळजवळ ठप्पच झाले. या घडामोडी सुरू असताना राज्य वाऱ्यावर टाकून गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले. राज्यातील अराजकापेक्षा फडणवीस यांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे. जरांगे यांचे उपोषण साधारण नाही”, असा इशारा शिवसेनेने (यूबीटी) भाजपला दिला आहे.
जरांगेंनी दिल्लीत जावं…
“जरांगे-पाटील यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडले, पण ही आश्वासने हवेतली ठरू नयेत. सरकारने शब्द पाळला नाही तर मुंबईचे नाक बंद करू, असा इशारा जरांगेंनी दिला. मुंबईचे नाक बंद करणे हे ठीक आहे. पण मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान मोदींच्या खिशात आहे व मोदी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत”, असं म्हणत शिवसेनेने (यूबीटी) जरांगेंना दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे.