Maharashtra : अजित पवारांच्या मदतीने भाजप एकनाथ शिंदेंना ठाण्यातच देणार आव्हान?
ठाणे जिल्हा हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे इथे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.
ADVERTISEMENT

Ajit Pawar vs eknath shinde : दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचं ठाण्यात मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. अजित पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईतील मंत्रालयासमोर पार्टी ऑफिस सुरु केल्यानंतर पहिलंच मोठं पक्ष कार्यालय अजित पवार गटाकडून ठाण्यात उघडण्यात आलं. पण, पक्ष कार्यालय उघडण्यासाठी अजित पवारांनी ठाणेच का निवडलं? यामागे कुठलं कारण आहे?
ठाण्यात पक्ष कार्यालय सुरू करुन खरंतर हे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न झाला आहे. नवीन कार्यालय जितेंद्र आव्हाडांच्या घराजवळ आहे. आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्याचबरोबर त्यांचा ठाण्यात देखील दबदबा आहे. अजित पवारांनी ठाण्यात केवळ कार्यालयच नाही, तर आव्हाडांच्या जवळचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांना देखील सोबत घेतलं आहे. त्यामुळे साहजिकच आव्हाडांना आव्हान उभं करण्यासाठी अजित पवारांना यांची मदत होणार आहे.
ठाणेच्या बाल्लेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग
दुसरीकडे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेची इथे अनेक वर्षांपासून सत्ता आहे. दाखवलं जात नसलं, तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून ठाण्यात आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न होताहेत, असं सांगितलं जात आहे.
वाचा >> ‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
ठाणे आणि कल्याणच्या लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झाला होता. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याणची जागा भाजप लढवेल, असं म्हंटलं होतं. त्यावरुन बरंच राजकारण झालं होतं. त्यातच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या देखील अनेक बैठका या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वाढल्या होत्या.