'...तर फडणवीसांनी अजित पवारांची माफी मागावी', उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
छत्रपती संभाजीनगरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय त्यांनी अजित पवारांची माफी मागावी अशी मागणीच यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
ADVERTISEMENT

छ. संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात आज (10 जानेवारी) जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. पण याचवेळी उद्धव ठाकरेंनी एक मोठी मागणी केली. ज्या अजित पवारांवर फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्यांनाच सत्तेत सोबत घेतल्याने फडणवीसांवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. पण याचवेळी उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, जर फडणवीसांनी दिलेले पुरावे खोटे असतील तर त्यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी.
'फडणवीस हे जर अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे घेऊन गेले होते आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंय तर आता ते पुरावे जाळावे? काय करावं त्याचं? दोन पैकी एक गोष्ट फडणवीसांनी केली पाहिजे. पुराव्यात तथ्य असेल तर अजित पवारांना मंत्रिपदावरून काढले पाहिजे. पुरावे खोटे असतील तर अजित पवारांची माफी मागावी. दोन पैकी एक काही तरी करा..' असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं आहे.
पाहा छ. संभाजीनगरात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...
'अजित पवार तोंड मोठं करून सांगतायेत की, ज्या लोकांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेत बसले आहेत. अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते. पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70 हजार कोटी रुपयांचा आरोप अजित पवारांवर केला होता त्यांच्या मांडीला मांडी कसे बसू शकतात?'
हे ही वाचा>> महाराष्ट्रातील सर्वात तत्वनिष्ठ पक्ष कोणता? CVoter चा सर्व्हे, दोन्ही राष्ट्रवादी सर्वात मागे; पाहा कोणाला पसंती?
'याबद्दल फडणवीसांना विचारलं तर फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे.. अहो तुम्ही चालू आहात.. केस तर चालू आहे माहितीए. पण ढिगभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना.. चौकशी कोणी लावली. जर पुरावे घेऊन गेला होतात आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केलंय तर आता ते पुरावे जाळावे? काय करावं त्याचं?'
हे ही वाचा>> एकसंध राष्ट्रवादी असताना अजितदादांना पुढे करुन तीन वेळेस तोंडावर पाडण्यात आलं, देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
'दोन पैकी एक गोष्ट फडणवीसांनी केली पाहिजे. पुराव्यात तथ्य असेल तर अजित पवारांना मंत्रिपदावरून काढले पाहिजे. पुरावे खोटे असतील तर अजित पवारांची माफी मागावी. दोन पैकी एक काही तरी करा.. दुतोंडी गांडुळासारखे वळवळ करू नका सत्तेसाठी.'










