Maha Vikas Aghadi : आंबेडकरांचे काँग्रेससोबत सूर जुळेना! ‘वंचित’ एका अटीमुळे ‘मविआ’तून बाहेरच
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आंबेडकर नेमके काय म्हणाले आहेत?
ADVERTISEMENT

Prakash Ambedkar Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या सह्यांचे पत्र प्रकाश आंबेडकरांना दिले. पण, वंचित बहुजन आघाडी अजूनही महाविकास आघाडीत सामील झालेली नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. असं काय घडलंय की, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झालेली नाही, असे आंबेडकर म्हणताहे, तेच समजून घ्या.
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत असल्याची घोषणा केली. पण, आंबेडकर अजूनही तसं मानायला तयार नाहीत. त्याचं कारणही आंबेडकरांकडून सांगण्यात आले आहे.
Maha Vikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं काय?
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला आहे, असे मानायचे की नाही? या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांनी जे उत्तर दिले ते खूप महत्त्वाचे आहे. आंबेडकर म्हणाले, “अजून मानायचं नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं असेल, तर काँग्रेस नेतृत्वाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्याला मान्यता दिली पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची मान्यता आहे की, नाही हेच आम्हाला माहिती नाही.”
“नाना पटोले पत्रव्यवहार करत आहेत. पण, आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वाचे आहेत, ते निर्णय घेतील. त्या पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही.”










