Pooja Khedkar: IAS पूजा खेडकरांनी पुण्यात नेमकं काय केलं?, कलेक्टरांचं 'ते' पत्र जसंच्या तसं..
IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात दिलेला अहवाल आता समोर आला आहे. जाणून घ्या त्या पत्रात नेमकं काय नमूद केलंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पुण्याहून थेट वाशिमला बदली, पूजा खेडकर अडचणीत
IAS पूजा खेडकरांच्या तक्रारीचं पत्र आलं समोर
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सविस्तर अहवाल
IAS Pooja Khedkar complaint: मुंबई: IAS पूजा खेडकर यांच्या अरेरावी वर्तणुकीमुळे त्यांची थेट पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. परिविक्षाधीन असलेल्या सुरुवातीच्या काळातच पूजा खेडकर यांची वर्तणूक ही योग्य नसल्याची तक्रार स्वत: पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाकडे केली होती. ज्यानंतर कारवाई म्हणून पूजा खेडकर यांची थेट बदली करण्यात आली. (what exactly did ias pooja khedkar do in pune read pune collector complaint letter as it is)
ADVERTISEMENT
दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिव यांना पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीबाबत जो अहवाल दिला होता तो आता समोर आला आहे. पाहा यामध्ये नेमकं काय-काय म्हटलंय..
IAS पूजा खेडकर यांची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांचं ते पत्र जसाच्या तसं..
विषय : भा.प्र.से. परिविक्षाधीन अधिकारी - २०२३ या तुकडी अंतर्गत अधिकारी यांना सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रशिक्षण देणेबाबत.
हे वाचलं का?
श्रीमती पूजा मनोरमा दिलीप खेडकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी
संदर्भ :- १) अपर जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. अजिप/कावि/ ३६१/२०२४, दि. २१/०६/२०२४ २) तहसिलदार सर्वसाधारण यांचा अहवाल क्र. पसई/कावि/१८१/२०२४,
दि. २१/०६/२०२४
ADVERTISEMENT
महोदय,
ADVERTISEMENT
मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक. पदनि- २०२४/प्र.क्र.४२/ई-८, दिनांक १८/०३/२०२४ अन्वये श्रीमती पूजा मनोरमा दिलीप खेडकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी यांना सहायक जिल्हाधिकारी या पदाचे प्रशिक्षणासाठी पुणे जिल्हा वाटप करण्यात आलेला आहे. तद्अनुषंगाने या कार्यालयाकडील आदेश क्र. पमई १/कावि/ ५७/२०२४, दिनांक ०३/०६/२०२४ अन्वये श्रीमती पूजा मनोरमा दिलीप खेडकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी यांचा या जिल्हयातील प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. (प्रत सोबत सादर केली आहे)
हे ही वाचा>> Pooja Khedkar: पूजा खेडकरांना मोदी सरकारकडून मोठा धक्का, IAS ची नोकरीच धोक्यात?
श्रीमती पूजा खेडकर, या पुणे जिल्हयामध्ये रुजू होण्यापूर्वीच त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांना व्हॉटस्अॅप द्वारे निरोप देऊन, त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई याबाबत वारंवार आग्रही मागणी केलेली आहे. श्रीमती पूजा खेडकर या दिनांक ०३/०६/२०२४ रोजी पुणे जिल्हयात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. प्रथम त्याच दिवशी त्यांनी पुन्हा याबाबत विचारणा केल्यानंतर, भा.प्र.से. सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन, गाडी व शिपाई या सुविधा अनुज्ञेय नाहीत. निवासस्थानाबाबत निश्चितपणे व्यवस्था करण्यात येईल याबाबत आश्वस्त करण्यात आले होते. दिनांक ०३ ते १४ जून २०२४ या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित केलेल्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि इतर शाखाधिकारी यांच्यासमवेत बसून कामकाजाची माहिती घेणेबाबत सूचित करणेत आले होते. आणि मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर बैठक व्यवस्था करुन देण्यात येईल. तुर्त आपण निवासी उपजिल्हाधिकारी या महिला अधिकारी असल्याने त्यांचे अॅन्टी चेंबर वापरावे असे सूचित करण्यात आले होते. तथापि श्रीमती खेडकर यांनी पुन्हा विनंती केल्याने, महिला अधिकारी या नात्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांना त्यांची बैठक व्यवस्था करणेबाबत सांगितले होते.
तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालय, ए विंग चौथा मजला, कुळकायदा शाखेतील स्वतंत्र कक्ष असणा बैठक व्यवस्था त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. परंतु श्रीमती खेडकर यांनी स्वतंत्र कक्षाला अटॅच्ड बाथरुमची सुविधा उपलब्ध नसल्याने सदर बैठक व्यवस्था नाकारली. तद्नंतर श्रीमती खेडकर यांनी स्वतः त्यांचे वडीलांसोबत कार्यालयाची पाहणी करुन या कार्यालयातील बी विंग चौथा मजला, खनिकर्म शाखे शेजारील अटॅच्ड बाथरुमची सुविधा उपलब्ध असलेले VIP सभागृह शोधून काढले. त्याप्रमाणे त्यांना सदर VIP सभागृहामध्येदिनांक १२ जून २०२४ रोजी त्यांचेसाठी बैठक व्यवस्था करणेत आलेली होती. सदर सभागृहामध्ये त्यांनी इलेक्ट्रीक फिटींग्ज उपलब्ध करुन देणेकामी सांगितले. तद्अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधिकारी यांनी समक्ष चर्चा करुन सदर जुन्या इलेक्ट्रीक फिटींग्ज सद्यस्थितीत उपलब्ध नसलेने त्या लावता ये नसलेबाबत सांगितले. परंतु जुन्याच इलेक्ट्रीक फिटींग्ज बसवून हव्या आहेत या गोष्टीवर अडून राहील्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व बैठक व्यवस्था करुनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सदर सभागृहामध्ये सुविधा योग्य नाही असे सांगून सदर बैठक व्यवस्था त्यांनी स्वतःहून नाकारली होती. त्याचवेळी “तुम्ही तुमची संपूर्ण शासकीय सेवा पूर्ण होईपर्यंत अपर जिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहचू शकणार नाही, श्रीमती खेडकर मॅडम येण्यापूर्वीच त्यांची सर्व कार्यालयीन व्यवस्था करणे अपेक्षित होते, सर्व बैठक व्यवस्था केलेशिवाय जायचे नाही" असे असंबंध, अशोभनीय शब्दप्रयोग श्रीमती खेडकर यांचे वडीलांनी मा. तहसिलदार सर्वसाधारण शाखा यांना केलेले आहेत.
हे ही वाचा>> Pooja Khedkar: IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅटच आलं समोर, नेमकं काय आहे यात?
तद्नंतर श्रीमती खेडकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांचे कक्षाशेजारी मला बैठक व्यवस्था देण्यात यावी, अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयही पाचव्या मजल्यावर असल्याने माझेही कार्यालय पाचव्या मजल्यावरच असावे असा तहसिलदार सर्वसाधारण शाखा यांचेकडे समक्ष व भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून अट्टाहास केलेला आहे. दिनांक १३/०६/२०२४ रोजी श्रीमती खेडकर यांनी पुनश्चः स्वतः त्यांचे वडीलांसोबत कार्यालयाची पाहणी करुन, अपर जिल्हाधिकारी यांना भेटून, अपर जिल्हाधिकारी पुणे यांचे अॅन्टीचेंबर मध्ये बैठक व्यवस्था करणेबाबत आग्रही विनंती केली. अपर जिल्हाधिकारी यांनी, श्रीमती खेडकर यांना आपण माझे अॅन्टी चेंबर बसण्यासाठी वापरु शकता असे सांगितले. त्यावेळी श्रीमती खेडकर यांचे वडील यांनी “अन्य जिल्हयामध्ये परिविक्षाधीन अधिकारी यांचेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची सोय करणेत आलेली असताना मात्र पुणे जिल्हयात अशी व्यवस्था इमारत बांधकाम करताना का करणेत आली नाही, ही इमारत कोणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केली, त्यावेळेसच परिविक्षाधीन अधिकारी यांचेसाठी स्वतंत्र दालन निर्माण करणेबाबत का विचार करण्यात आला नाही" असे कथन तहसिलदार सर्वसाधारण शाखा व अपर जिल्हाधिकारी यांना केले.
मात्र दि. १८ जून २०२४ ते २० जून २०२४ या कालावधीत अपर जिल्हाधिकारी पुणे हे मंत्रालयात उपस्थित होते. त्यादरम्यान, श्रीमती खेडकर यांनी अपर जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत सदर अॅन्टीचेंबर मध्ये असलेले सर्व साहित्य (खुर्च्या, टेबल, सोफा इ.) हे अॅन्टीचेंबरच्या बाहेर काढले आणि सदर अॅन्टी चेंबरमध्ये श्रीमती खेडकर यांनी दिनांक २०/०६/२०२४ रोजी सर्वसाधारण शाखेतील महसूल सहायक यांना समक्ष बोलावून घेऊन लेटर हेड, व्हिझीटींग कार्ड, टेबल वरची काच, पेपरवेट, राष्ट्रध्वज, नेमप्लेट, कॉम्प्युटर, राजमुद्रा, इंटरकॉम फोन, प्रिंटर इ. साहित्य उपलब्ध करुन देणेबाबत तोंडी सूचना दिल्या. आणि कक्षाचा ताबा घेऊन सदर कक्षाच्या बाहेर स्वतःच्या नाव व पदनामाचा नामफलक देखील लावला.
उपरोक्त सर्व घटना या माझ्या अनुपस्थितीमध्ये तसेच माझी कोणतीही पुर्वपरवानगी न घेता घडलेल्या आहेत. दिनांक २१/०६/२०२४ रोजी माझ्याकडे अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार सर्वसाधारण यांनी याबाबत अहवाल सादर केला. तद्नंतर मी अपर जिल्हाधिकारी यांचा कक्ष पुर्ववत करणेबाबत सूचना दिल्या. श्रीमती खेडकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी दिनांक १४/६/२०२४ रोजी संपुष्टात आलेला आहे. दिनांक १५ जून ते १७ जून २०२४ या सुट्टीच्या कालावधीनंतर इतर शासकीय कार्यालयांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेणे अभिप्रेत आहे. मात्र दिनांक २१/०६/२०२४ रोजी सायंकाळी श्रीमती खेडकर यांनी मला व्हॉटस्अॅप द्वारे मेसेज पाठविला व त्यामध्ये त्यांनी “माझ्याबरोबर जेवढे अधिकारी आहेत त्यांना बसण्यासाठी चेंबर व गाडीची व्यवस्था केलेली आहे, काही ठिकाणी तर निवासी उपजिल्हाधिकारी यांचे चेंबर खाली करुन त्या ठिकाणी नवीन भा.प्र.से. अधिकारी यांची सोय केलेली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या चेंबरमधून बाहेर काढल्यामुळे माझा मोठा अपमान होणार आहे व तो मला सहन करणे शक्य होणार नाही" असे निवेदन केलेले आहे. दिनांक २१/०६/२०२४ रोजी सायंकाळी श्रीमती खेडकर यांच्या वडीलांनी तहसिलदार सर्वसाधारण यांना भ्रमणध्वनीद्वारे “महिला अधिकारी असलेल्या माझ्या मुलीला तुम्ही सर्वजण मिळून जाणुनबुजून त्रास देत आहात, तुम्हाला या सर्व गोष्टींचा भविष्यात त्रास होईल” अशा आशयाचे धमकी वजा वक्तव्य केलेले आहे.
यापूर्वीही संवर्गनिहाय अनेक परिविक्षाधीन अधिकारी यांनी या जिल्हयात प्रशिक्षण घेतलेले आहे. परंतु कोणीही उपरोक्त नमूद केलेप्रमणे सोईसुविधा उपलब्ध करुन देणेबाबत मागणी केलेली नाही. तसेच परिविक्षाधीन अधिकारी यांना सोईसुविधा उपलब्ध करुन देणेबाबत कोणतीही शासन तरतूद अस्तित्वात नाही. दिनांक १५/०६/२०२४ ते १३/१०/२०२४ हा पुढील प्रशिक्षण कालावधी पुणे जिल्हयातील इतर विविध कार्यालयांमध्ये निश्चित केलेला असलेने सदर प्रशिक्षण संबंधित कार्यालयात उपस्थित राहून घेणे अपेक्षित आहे.
श्रीमती खेडकर या त्यांच्या वैयक्तिक खाजगी वाहनावर अंबर दिवा लावत असून तो दिवसादेखील चालू ठेवतात असे निदर्शनास आलेले आहे. प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासूनच श्रीमती खेडकर यांच्याशी बोलताना प्रशासनाकडून एकूणच केवळ भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहोत म्हणून प्रशासन आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून त्यांच्या अवास्तव अपेक्षा दिसून येतात. त्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांचे स्थान, त्यांचे हक्क, हाताखालील अधिकारी कर्मचारी यांचेकडून हवा असलेला आदर आणि सामाजिक प्रतिष्ठा याबाबत त्यांच्या विचारांमध्ये हक्काची भावना दिसून येते. मी व्यक्तीश: याबाबतीत त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करुन अधिकारी या नात्याने हक्कापेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे, आणि त्यासाठी आपण चांगले प्रशिक्षण घ्यावे व त्याद्वारे उत्कृष्ठ काम केल्याने आपणास हवी असलेली प्रतिष्ठा, सन्मान निश्चितपणे प्राप्त होईल असे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मात्र श्रीमती खेडकर यांची एकूण वर्तणूक ही प्रशासकीय अधिकाऱ्यास शोभेल अशी नाही हे त्यांनी पाठविलेले मेसेजेस आणि त्यांच्या वर्तणूकीवरुन दिसून येते. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी हव्या असलेल्या सोईसुविधा याबद्दल आग्रह अनाठायी आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये श्रीमती खेडकर यांच्या वडीलांची वर्तणूक ही आक्षेपार्ह असून कारवाईस पात्र आहे.
उपरोक्त वस्तुस्थितीचे अवलोकन करता, प्रशासकीय गुंतागुंत टाळण्यासाठी श्रीमती खेडकर यांचे प्रशिक्षण पुणे जिल्हयामध्ये सुरु ठेवणे योग्य होणार नाही. सबब, त्यांना प्रशिक्षणासाठी इतर जिल्हयामध्ये नियुक्ती देण्यात यावी ही विनंती. तसेच श्रीमती खेडकर यांचे उपरोक्त वर्तणूकीबाबत आवश्यक ती कार्यवाही आपले स्तरावर करणेस विनंती आहे.
सोबत - १) श्रीमती खेडकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना व मला पाठविलेले व्हॉटस्अॅप मेसेज
२) अपर जिल्हाधिकारी यांचे पत्र दि. २१/०६/२०२४
३) तहसिलदार सर्वसाधारण यांचा अहवाल दि. २१/०६/२०२४
४) श्रीमती खेडकर यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचे फोटो
५) अपर जिल्हाधिकारी यांच्या अॅन्टी चेंबरमध्ये श्रीमती खेडकर यांनी करुन घेतलेल्या व्यवस्थेचे फोटो.
सोबत
पृष्ठ क्रमांक 1 ते 27 असे.
आपला विश्वासू
(डॉ. सुहास दिवसे)
जिल्हाधिकारी पुणे
प्रत :- १) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
२) मा. अपर मुख्य सचिव, महसूल, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ ३) मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT