Lok Sabha 2024: मोदी-शाहांशी एकनिष्ठ असलेले कृपाशंकर सिंह आहेत तरी कोण?, BJP च्या पहिल्याच यादीत नाव

रोहित गोळे

ADVERTISEMENT

कोण आहेत कृपाशंकर सिंह?
कोण आहेत कृपाशंकर सिंह?
social share
google news

BJP 1st List and Kripashankar Singh: मुंबई: देशात जेव्हापासून मोदी पर्व सुरू झालं तेव्हापासूनच काळाची पावलं ओळखून काँग्रेस आणि इतर पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपची साथ धरली. त्यापैकी असंच एक नाव म्हणजे कृपाशंकर सिंह. काही वर्षांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कृपाशंकर सिंह यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यानंतर भाजपमधील नेतृत्वाशी कायम एकनिष्ठ राहत कृपाशंकर सिंह यांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली. ज्याचं फळ अखेर आज (2 मार्च) त्यांना मिळालं आहे. होय.. कृपाशंकर सिंह यांना भाजपने थेट उत्तर प्रदेशातून उमेदवारी दिली आहे. (who is kripashankar singh loyal to modi and shah singh got candidature in first list announced by bjp for lok sabha elections 2024)

कधी काळी राज्य गृहमंत्री राहिलेल्या कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास हा फारच इंटरेस्टिंग राहिला आहे. चला तर जाणून घेऊयात नेमके कोण आहेत कृपाशंकर सिंह.

मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे असलेले कृपाशंकर सिंह हे 2004 च्या काँग्रेस सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. कृपाशंकर सिंह हे अगदी सामान्य कुटुंबातून आलेले. पण तरीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी त्यांनी एका औषध कंपनीत काम केलेलं. तर नंतरच्या काळात त्यांनी बटाटे आणि कांदेही विकले होते. पण नंतरच्या काळात त्यांच्याविरोधात 300 कोटींहून अधिक संपत्ती बेकायदेशीरपणे जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे प्रकरण काहीसं मागे पडलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईत विकले कांदे-बटाटे 

कृपाशंकर सिंह हे 1971 साली जौनपूरहून कामाच्या शोधात मुंबईत आले होते. मुंबईतील सांताक्रूझ परिसरात झोपडपट्टीत राहणारे कृपाशंकर सिंग हे औषध निर्मिती कंपनीत काम करायचे. या कामाच्या मोबदल्यात त्यांना दिवसाला आठ रुपये मिळत होते. मात्र हा पैसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे इतर वेळात ते रस्त्यावर बटाटे आणि कांदे विकायचे.

हे ही वाचा>> 2019 ला तिकीट कापलं, आज थेट मोदींचीच उमेदवारी जाहीर

उत्तर भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय

कृपाशंकर यांच्या जवळचे लोक सांगतात की, एकेकाळी कृपाशंकर सिंह यांच्याकडे त्यांच्या मुलांच्या दुधासाठीही पैसे नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही आणि कधीच कोणाला त्यांना असणाऱ्या अडचणींची जाणीवही करून दिली नाही. इतरांच्या अडचणीतही ते कायम मदत करत राहिले, त्यामुळे काही दिवसांतच ते सामान्य उत्तर भारतीयांमध्ये लोकप्रिय झाले.

ADVERTISEMENT

इंदिरा गांधींकडून घेतली सक्रिय राजकारणात येण्याची प्रेरणा 

ADVERTISEMENT

कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूर येथील स्वातंत्र्यसैनिक होते. मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्टीच्या समस्यांसाठी आवाज उठवला आणि स्थानिक पातळीवर काम सुरू केले. काही वर्षांनंतर, कृपाशंकर सिंह एका कार्यक्रमादरम्यान माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना भेटले आणि त्यांच्या सांगण्यावरून सक्रिय राजकारणात सामील झाले.

मुंबईतून अंडरवर्ल्डचा खात्मा

कृपाशंकर सिंह यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. आधी कार्यकर्ता असलेले कृपाशंकर पुढे ते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस झाले आणि नव्वदच्या दशकात विधानपरिषदेचे आमदार आणि नंतर ते विधानसभेवर निवडून गेले. 2004 च्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांना थेट गृहराज्यमंत्रीपद मिळालं, ज्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली आणि अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

कृपाशंकर सिंह बोलतात उत्तम मराठी 

कृपाशंकर हे मूळचे उत्तर भारतीय असले तरी मुंबईत अनेक वर्ष राहिल्याने त्यांनी मराठी संस्कृती अंगीकारली आहे. ते अस्खलितपणे मराठी बोलतात आणि मुंबईत येणाऱ्यांनी मराठी मार्ग स्वीकारावा, तरच सर्वजण एकोप्याने जगू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे. उत्तम मराठी बोलल्यामुळे कृपाशंकर मराठी भाषिकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत.

हे ही वाचा>> महाराष्ट्रातील फक्त 'एका' नेत्याची उमेदवारी जाहीर, पण..

कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत कृपाशंकर सिंह

तीन वेळा आमदार राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मुंबईत घर आणि इतर संपत्तीही त्यांच्याकडे बरीच आहे.

300 कोटींहून अधिक संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केल्याचा होता आरोप 

कृपाशंकर यांच्यावरही बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बरेच आरोप झाले होते. आरोपानुसार, 1999 मध्ये आमदार झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांचे उत्पन्न केवळ 45,000 रुपये प्रतिमहिना होते, मात्र 1999 ते 2014 या काळात त्यांनी डझनहून अधिक जमिनी, फ्लॅट्स आणि इतर स्थावर मालमत्ता त्यांनी खरेदी केल्या. 

अंदाजे 320 कोटी रुपयांची ही मालमत्ता त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचाही समावेश आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. बेकायदेशीरपणे मालमत्ता निर्माण करणे आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT