धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार? अजित पवार आणि CM फडणवीसांची ‘सागर’वर खलबतं
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा सरकारवरील दबाव हा वाढत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तींयांना देखील अटक झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्या सरकारवर त्याचा दबाव वाढत आहे. अशातच काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट सागर बंगल्यावर दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मागील तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांनी आज (6 जानेवारी) सकाळीच मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तासभर अजितदादांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फक्त असं म्हटलं की, 'नववर्षानिमित्त मी अजितदादांची भेट घेतली आणि त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच माझ्या अन्न व पुरवठा या खात्याच्या पुढील कामांविषयी त्यांच्याशी चर्चा केली.'
हे ही वाचा>> Suresh Dhas Parbhani : अजितदादा क्या हुआ ते वादा? बीडमधील परिस्थिती सांगत सुरेश धस यांचा तुफान हल्लाबोल
मात्र, धनंजय मुंडे हे तब्बल तासभर अजित पवारांसोबत चर्चा करत होते. अशावेळी या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण अधिक तापल्यानंतर आणि धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांना अटक केल्यानंतर अजित पवार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, मागील जवळजवळ दोन आठवडे अजित पवार यांनी यावर काहीच भाष्य केले नव्हते.










