Maharashtra Politics: शिंदे-अजित पवारांवर मतदार प्रचंड नाराज?, सर्व्हेतून धक्कादायक खुलासे
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पक्षात जी फूट पाडली ती महाराष्ट्रातील मतदारांना पसंत पडलेली नाही असा खुलासा सकाळ वृत्तसमूहाने केलेल्या सर्व्हेतून समोर आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांनी (Ajit Pawar) जे बंड केलं त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप होत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी जरी विकासासाठी भाजपसोबत (BJP) जात असल्याचं म्हंटलं असलं तरी जनता ही शरद पवारांच्या बाजूने असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांनी पक्षातच ज्या पद्धतीने फूट पाडली आहे. ती मतदारांना अजिबात रुचली नसल्याचं आता एका सर्व्हेतून समोर आलं आहे. (survey revealed split in the party eknath shinde and ajit pawar has not been liked by voters of maharashtra latest political news maharashtra)
सकाळ वृत्तपत्राने नुकताच केलेल्या सर्व्हेनुसार राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडात 43.6 टक्के लोकांना शरद पवारांची बाजू योग्य वाटते तर 23.1 टक्के लोकांना अजित पवारांची बाजू योग्य वाटते. 33.3 टक्के जनतेने सांगता येत नाही असं म्हंटलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ समूहाने केला आहे. 74 हजार 330 इतक्या मतदारांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला.
महाविकास आघाडीला मिळू शकतो मोठा कौल, भाजपची डोकेदुखी वाढणार?
या सर्व्हेमध्ये अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची निवड कराल या प्रश्नावर 26.8 टक्के मतदारांनी भाजपची निवड केली आहे. तर 19.1 टक्के लोकांनी काँग्रेसची निवड केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 14.9 टक्के राष्ट्रवादी अजित पवार गट 5.7 टक्के, शिवसेना ठाकरे गट 12.7 टक्के शिवसेना शिंदे गट 4.9 टक्के तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 2.8 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती?
त्याचबरोबर 2024ला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 21.9 टक्के पसंती देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांना 19.4 टक्के, अजित पवार यांना 9.5 टक्के, एकनाथ शिंदे यांना 8.5 त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना देखील 8.5 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. अशोक चव्हाण यांना 6.6 टक्के बाळासाहेब थोरात यांना 4.2 टक्के तर जयंत पाटील यांना 3.6 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. 17.8 टक्के मतदार सांगता येत नाही असं म्हणतात.