Sushma Andhare: उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, तर…; आप्पासाहेब जाधवांचे गंभीर आरोप
शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे आणि बीडचे बडतर्फ करण्यात आलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात चांगलाच वाद झाला. जाधव यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांनी सुषमा अंधारेंना चापट मारली. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि आप्पासाहेब जाधव यांचं म्हणणं काय आहे, याबद्दल मुंबई Tak ने जाधव यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितलं.
मुंबई Takशी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले, “जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडे सुषमा अंधारे यांनी पैसे मागितले. हा प्रकार पाच दिवसांपासून सुरू झाला. आधीही होता, पण मर्यादित होता. काही कार्यकर्ते डिझेल भरून द्यायचे. पण, आता 20 मे रोजी बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा आहे. त्या यात्रेसाठी संजय राऊत येणार आहेत. नांदेडहून परळीत येणार आहे आणि सुषमा अंधारे यांच्या घरी जाणार आहेत. त्यांच्या घरी बसण्याची सोय नाही म्हणून त्यांनी घराशेजारी शेड आहे. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून एसी घेतली, फर्निचर घेतलं. सोफे घेतले. काहीजणांकडे रोख पैसे मागितले.”
उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ मागितली
“सुषमा अंधारेंनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी या गोष्टी सुरू केल्या. मी वरिष्ठांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. परवा दिवशी (17 मे) आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. मी चार वेळा कॉल केला आणि त्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पीए म्हात्रे यांनी फोन घेतला आणि सांगितलं की थोड्या वेळाने सांगतो. नंतर त्यांना कॉल्स केले पण त्यांनी घेतले नाही.”
हेही वाचा >> ‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?
“माझी उद्धव ठाकरेंसोबत काल (18 मे) भेट झाली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. मी संपर्कप्रमुखांना, वरिष्ठांना सांगितलं. त्यांनीही उद्धव ठाकरेंची वेळ घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे. पण, परिस्थिती अचानक उद्भवली.”