Nawab Malik : “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट
Nawab Malik Shiv Sena UBT bjp : नवाब मलिकांना सोबत घेण्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजपने विरोध केला आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट कोंडीत सापडला असून, आता ठाकरेंनी यात उडी घेत फडणवीस आणि भाजपला सवाल केले आहेत.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Nawab Malik : नवाब मलिकांच्या एन्ट्रीने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात विसंवाद असल्याचे समोर आले. विधासभेत मलिक सत्ताधारी बाकावर बसले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून विरोध केला. हा मुद्दा तापला असून, विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवत त्या पत्रावर भाष्य केलं आहे. (Saamana Editorial on Devendra Fadnavis letter to Ajit Pawar)
सामना अग्रलेखातून ठाकरेंनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट’ या अग्रलेखात म्हटले आहे की, “पैशांचे सोंग आणता येत नाही, पण नैतिकतेचे ढोंग मात्र हमखास आणता येते. अशा ढोंगाचे प्रात्यक्षिक नवाब मलिक यांच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.”
“नैतिकता कशी पचपचीत झाली?”
“मलिकांनी आता अजित पवार गटाचा आश्रय घेतला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकांवर म्हणजेच अजित पवार गोटात जाऊन बसताच विरोधकांनी भाजपचे वस्त्रहरण सुरू केले. मलिक यांच्या बाबतीत आधी काय बोलत होतात व आता ते तुमच्या गोटात शिरल्यावर तुमची नैतिकता कशी पचपचीत झाली आहे? असे सवाल उठताच भाजपने त्यांच्या वॉशिंग मशीनचे बटण बंद करून स्वतःला विचारमंथनात बुडवले”, असा चिमटा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपला काढला आहे.
हेही वाचा >> MLA Disqualification: शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंच्या वकिलांनी घेरलं… वाचा सुनावणी जशीच्या तशी
“फडणवीस यांनी अजित पवारांना विधान भवनाच्या आवारातच पत्र लिहून नैतिकतेची उबळ बाहेर काढली. फडणवीस आपल्या पत्रात लिहितात, ‘काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा सारा चोथाच केला राव! नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. मलिक यांना कोर्टाने निर्दोष सोडले नसून त्यांना फक्त वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. मलिकांसारखे लोक सत्ताधारी बाकांवर आले तर महायुतीस बाधा पोहोचेल,’ अशा प्रकारच्या मंबाजी छाप कीर्तनाचा सूर त्यांनी लावला”, अशा शब्दात फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर ठाकरेंच्या शिवसेनेने उपरोधिक भाष्य केले आहे.










